Rajinikanth on CM Vijay : ‘माझ्या मनात विजयबद्दल ईर्षा का असावी?’; अफवांवर सुपरस्टार रजनीकांत यांचे सडेतोड उत्तर

spot_img

थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या यशानंतर रजनीकांत यांनी ट्रोलर्सना सुनावले; चाहत्यांना संयम बाळगण्याचे आवाहन

तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून, अभिनेते सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांनी मुख्यमंत्रीपद पटकावल्यानंतर चित्रपटसृष्टीतील महानायक रजनीकांत यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले आहे. नुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत रजनीकांत यांनी विजय यांच्या यशाचा गौरव केला. विजय यांनी अत्यंत कमी वयात दिग्गज अभिनेते एनटीआर यांच्यापेक्षाही मोठे यश संपादन केले आहे, अशा शब्दांत त्यांनी विजय यांची पाठ थोपटली. तसेच, सोशल मीडिया आणि चित्रपटांनी तमिळनाडूच्या द्रविड राजकारणाला नवी दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेत रजनीकांत यांनी त्यांच्या आणि विजय यांच्यातील कथित वादाच्या अफवांना पूर्णविराम दिला. निवडणूक निकालानंतर रजनीकांत यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या नव्हत्या आणि विमानतळावरही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, अशा चर्चा रंगल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना रजनीकांत म्हणाले, “जर मी या अफवांवर गप्प राहिलो असतो, तर लोकांनी त्यालाच सत्य मानले असते. विजय आणि माझ्या वयात २५ वर्षांचे अंतर आहे. मी आता राजकारणातही नाही, मग मला त्याचा हेवा किंवा मत्सर वाटण्याचे काय कारण? रजनीकांत हा इतका नीच माणूस नाही की कोणावरही विनाकारण चिखलफेक करेल.”

दरम्यान, रजनीकांत यांनी निकालानंतर एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, स्टॅलिन यांच्याशी असलेली माझी मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे आणि ते कुलथूर मतदारसंघातून पराभूत झाल्याचे मला नक्कीच दुःख आहे. शेवटी, विजय यांच्या चाहत्यांना आणि जनतेला आवाहन करताना रजनीकांत म्हणाले की, लोकांच्या विजय यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. मात्र, त्यांना काम करण्यासाठी किमान दोन वर्षांचा वेळ दिला पाहिजे आणि त्यांच्या सन्मानाला कुठेही धक्का लागणार नाही, याची काळजी त्यांच्या चाहत्यांनी घेतली पाहिजे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ