‘गॅस पेपर’ कोडवर्ड वापरून १०-१० लाखांना विकल्या प्रश्नपत्रिका, ५ जिल्ह्यांत होते नेटवर्क!
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET-UG) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत ‘महाराष्ट्र मॉड्यूल’चा पर्दाफाश केला आहे. गेल्या २४ तासांत सीबीआयने ६ ठिकाणी धाडी टाकून पुण्यातून वनस्पतीशास्त्र (Botany) विषयाच्या वरिष्ठ प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांधारे यांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्राध्यापिका मांधारे आणि या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी हे दोघेही राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (NTA) प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या मुख्य तज्ज्ञ पॅनेलचे सदस्य होते. याच पदाचा गैरफायदा घेत कुलकर्णीने वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र (Zoology) विषयांचे मूळ पेपर आधीच हस्तगत केले होते. पुण्यात घरगुती शिकवणी घेणारा कुलकर्णी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नच ‘संभाव्य प्रश्न’ (Guess Paper) या सांकेतिक कोडवर्डखाली वहीत लिहून घ्यायला सांगायचा. “मी जे सांगतोय ते विसरू नका, विसरलात तर संपलात,” असा दमच तो विद्यार्थ्यांना द्यायचा. या मूळ प्रश्नपत्रिकांची कोट्यवधी रुपयांना विक्री केली जात होती.
या काळ्या कारभारात कुलकर्णीला पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे हिची साथ लाभली होती. सौंदर्य व्यवसायाच्या आडून मनीषाने नीट आणि जेईई-सीईटी (JEE-CET) चे पेपर फोडणारे एक अवाढव्य जाळे विणले होते. तिने कोचिंग क्लासेस, समन्वयक आणि वैद्यकीय सल्लागार कंपन्यांच्या मदतीने एजंटची एक मोठी फौझ तयार केली होती. सीबीआयच्या तपासात हे रॅकेट महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, नाशिक, लातूर आणि बीड या ५ जिल्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचे समोर आले आहे. बीडमार्गे या रॅकेटची पाळेमुळे थेट राजस्थान आणि गुरुग्रामपर्यंत पोहोचली होती. टेलिग्राम ॲपचा वापर करून हा फुटलेला पेपर वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत राजस्थानमधील एका कुटुंबाला तब्बल १० लाख रुपयांना विकण्यात आला होता. सीबीआयने या कारवाईत लॅपटॉप, मोबाईल आणि बँक खात्यांचे दस्तऐवज जप्त केले असून, न्यायालयाने मुख्य आरोपी पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांधारे यांना १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक झाली असून, आगामी काळात महाराष्ट्रातील अनेक बड्या हस्तींना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.




