देशातील महागाई आणि व्हीआयपी संस्कृतीवर अभिनेत्री कुनिका सदानंद कडाडली; जनतेला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन
बॉलिवूडमधील आपल्या संस्मरणीय भूमिकांनंतर आता एक वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सक्रिय असलेली ‘बिग बॉस १९’ ची स्टार कुनिका सदानंद हिने देशातील राजकीय आणि सामाजिक स्थितीवर अत्यंत स्फोटक वक्तव्य केले आहे. सोशल मीडियावर नेहमीच निडरपणे मते मांडणाऱ्या कुनिकाने वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे कडाडलेले दर आणि सामान्यांची होणारी होरपळ यावरून सत्ताधारी भाजप सरकारवर थेट शब्दांत निशाणा साधला आहे. “सध्या देशातील संपूर्ण सिस्टम आणि सरकारी संस्था केवळ एकाच राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी काम करत आहेत, अशा वातावरणात मी स्वतःला अत्यंत हतबल (हेल्पलेस) समजत आहे,” अशी खंत तिने व्यक्त केली.
इंधनाच्या वाढत्या किमतींवरून केंद्र सरकारला धारेवर धरताना कुनिकाने थेट इतिहास आणि ‘पीएम केअर्स फंडा’चा दाखला दिला. ती म्हणाली, “आज भाजपकडे देशात सर्वाधिक रोख रक्कम आणि निधी जमा आहे. हा पैसा देशातील जनतेचाच असल्याने तो आता संकटकाळात पुन्हा देशालाच दिला पाहिजे. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्ली आणि अलाहाबादमध्ये आपली संपत्ती देशासाठी दान केली होती, तर इंदिरा गांधी यांनी स्वतःचे दागिने देशाच्या चरणी अर्पण केले होते; मग सध्याचे सत्ताधारी तसे का करत नाहीत?” असा सडेतोड सवाल तिने उपस्थित केला. तसेच, देशात एकीकडे जनता उपाशी झोपत असताना आणि एलपीजी गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांची दमछाक होत असताना, दुसरीकडे नेतेमंडळी मात्र ३०० गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात, या व्हीआयपी संस्कृतीवरही तिने तीव्र संताप व्यक्त केला.
‘बेटा’, ‘खिलाडी’ आणि ‘हम साथ-साथ हैं’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी कुनिका म्हणाली की, जे देशाचा आणि गरिबांचा विचार करत नाहीत, ती चांगली लोकं असूच शकत नाहीत. देशात सुरू असलेला हा चुकीचा बदल आणि दडपशाही सुधारलेली पाहण्यासाठी मी आगामी काळात जिवंत राहीन की नाही, अशी भीती आता मला सतावत आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी आता घरात न बसता, एकत्र येऊन रस्त्यावर उतरावे आणि अन्यायाविरोधात स्वतःचा आवाज उठवावा, असे थेट आवाहनही तिने या संवादादरम्यान केले आहे.




