राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. पक्षातील बदलत्या समीकरणांमुळे आणि नेतृत्व पातळीवरील हालचालींमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना वगळण्यात आल्याच्या चर्चांदरम्यान आता रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
पक्षातील सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाबाबत बोलताना रोहित पवार यांनी थेट नाव न घेता काही वरिष्ठ नेत्यांवर टीका केली. त्यांनी म्हटले की, राजकारणात भूमिका घेताना विचारांशी प्रामाणिक राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. “आज त्यांच्यासोबत जे काही घडत आहे, ते योग्यच आहे,” असे वक्तव्य करत त्यांनी अप्रत्यक्षपणे तटकरे आणि पटेल यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेचाही उल्लेख केला. पक्षातील अनेक नेत्यांना शरद पवार यांनी मोठं केलं, त्यांना संधी दिली, मात्र काहींनी नंतर भूमिका बदलत वेगळी वाट धरली, असा सूचक टोला त्यांनी लगावला. तसेच “जे कोणाचेच नसतात, ते शेवटी कुणाचेच राहत नाहीत,” असे म्हणत त्यांनी पक्षातील निष्ठेवर प्रश्न उपस्थित केले.
रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांचाही उल्लेख करत, काही नेते सरकारसोबत किंवा विशिष्ट गटासोबत किती काळ टिकतील हे भविष्यात स्पष्ट होईल, असे सांगितले. त्यांच्या या विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, गटबाजी आणि नेतृत्व संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आल्याची चर्चा रंगू लागली आहे. राजकीय वर्तुळात आता पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.




