NEET 2026 : NEET 2026 पेपरफुटीचा मास्टरमाइंड पुण्यात अटकेत; ‘लातूर पॅटर्न’वरही प्रश्नचिन्ह

spot_img

वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET 2026 परीक्षा पेपरफुटीमुळे देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. 3 मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA ने 12 मे रोजी परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे देशभरातील 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली. परीक्षेच्या तणावातून आणि नैराश्यातून तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांमुळे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली. आता NTA कडून 21 जून रोजी पुनर्परीक्षा घेतली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात मोठी कारवाई करत पोलिसांनी पुण्यातून पी. व्ही. कुलकर्णी याला अटक केली आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, कुलकर्णी हा या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. तो दयानंद महाविद्यालय येथे तब्बल 28 वर्षे रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. निवृत्तीनंतरही तो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होता आणि शिक्षण क्षेत्रात आदरणीय शिक्षक म्हणून त्याची ओळख होती.

सीबीआयच्या तपासात असे समोर आले आहे की, कुलकर्णीचा NEET प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या अत्यंत गोपनीय समितीशी थेट संबंध होता. परीक्षा प्रक्रियेत सहभाग असल्यामुळे त्याला मूळ प्रश्नपत्रिकांपर्यंत थेट प्रवेश होता. याच विश्वासाचा गैरवापर करून त्याने केमिस्ट्रीचा पेपर बाहेर काढल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून आठ जणांना अटक करण्यात आली असून पुण्यातील एका महिलेचाही त्यात समावेश आहे. या घटनेमुळे एकेकाळी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘लातूर पॅटर्न’वरही टीका होत असून शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ