Jitendra Awhad : ‘स्वस्त दारू, महाग तेल!’; मोदींच्या आवाहनानंतर आव्हाडांचे ‘घोडागाडी’ आंदोलन, तर सदाभाऊ खोतांचा बोचरा वार

spot_img

मध्य पूर्वेतील युद्धाच्या सावलीत देशात आर्थिक रणकंदन; पंतप्रधानांच्या आवाहनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली

मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला बसणाऱ्या फटक्याचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दोन महत्त्वाची आवाहनं केली आहेत. परकीय चलनाची बचत करण्यासाठी आगामी एक वर्ष सोनं खरेदी टाळणे आणि इंधन बचतीवर भर देणे, अशा दोन मुख्य मुद्यांचा यात समावेश आहे. सध्या डॉलरचा दर १०० रुपयांच्या उंबरठ्यावर असल्याने आणि रुपयाची घसरण सुरू असल्याने देशाच्या तिजोरीवर मोठा ताण येत आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या आवाहनावरून देशात आता राजकीय वादाला तोंड फुटले असून, विरोधकांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचे वाभाडे काढायला सुरुवात केली आहे. राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या टीकेनंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात अनोख्या पद्धतीने ‘घोडागाडी आणि बैलगाडी’ मोर्चा काढून सरकारचा निषेध केला.

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल,” अशी घोषणाबाजी करत त्यांनी देशाची आर्थिक स्थिती खालावल्याचा आरोप केला. बंगालच्या निवडणुका होईपर्यंत सरकार शांत होते आणि आता जनतेवर निर्बंध लादले जात असल्याचे त्यांनी म्हटले. स्वतः परदेशी दौरे करायचे आणि इकडे जनता महागाईने होरपळत असताना मंत्र्यांच्या ताफ्यात गाड्यांचा ताफा फिरवायचा, हा कोणता न्याय? असा सवाल करत आव्हाड यांनी आगामी काळात महागाई आणखी वाढण्याचा इशारा दिला. त्यांच्या या आंदोलनाने ठाणे शहरात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दुसरीकडे, या आंदोलनावर महायुतीचे नेते आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी अत्यंत तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांच्या आंदोलनाचा समाचार घेताना खोत यांनी थेट ‘जिव्हारी’ लागणारी टीका केली. “मोदींनी देशाच्या हितासाठी केलेले आव्हान समजण्याची तुमची कुवत नाही,” असे सांगत त्यांनी “गधा क्या जाने गुड क्या चीज होती है?” अशा बोचऱ्या शब्दांत आव्हाडांना सुनावले. एका बाजूला आंतरराष्ट्रीय संकटाचे आर्थिक परिणाम आणि दुसरीकडे त्यावरून पेटलेले हे ‘घोडागाडी’ विरुद्ध ‘शब्दयुद्ध’, यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ