Rohit Pawar : ‘अजितदादांचे २२ आमदार कमळ चिन्हावर लढणार’; रोहित पवारांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

spot_img

सुनील तटकरे आणि शरद पवारांच्या भेटीनंतर नव्या चर्चांना उधाण; राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षावर रोहित पवारांचा ‘मोठा बॉम्ब’

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा ‘भूकंपा’चे वारे वाहू लागले असून, आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका खळबळजनक विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तब्बल तीन वर्षांनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन भेट घेतली. या भेटीला जरी ‘सदिच्छा भेट’ असे नाव दिले गेले असले, तरी रोहित पवारांनी यावर सडकून टीका केली आहे. “तटकरे यांना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा किंवा त्यांना त्यांच्या अध्यक्षांना काही गुप्त निरोप पोहोचवायचा असेल,” असा खोचक टोला लगावतानाच रोहित पवारांनी एक मोठा दावा केला. प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह अजित पवार गटाचे २२ आमदार आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या विधानामुळे महायुतीमधील अंतर्गत हालचालींकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

रोहित पवारांच्या या दाव्यानंतर अजित पवार गटातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आमदार अनिल पाटील यांनी यावर पलटवार करताना म्हटले की, “आमच्या पक्षाबाबत कोणत्याही ‘भविष्यकाराने’ भाकीत करण्याची गरज नाही.” त्यांनी स्पष्ट केले की, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे अजिबात नाराज नसून माध्यमांमध्ये मुद्दाम चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहेत. दुसरीकडे, आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या भावनिक आवाहनावरही रोहित पवारांनी निशाणा साधला. “डोळ्यात पाणी आणून काही होणार नाही, आधी अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवा,” असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली. एका बाजूला सदिच्छा भेटी आणि दुसऱ्या बाजूला पक्षांतराचे दावे, या चक्रव्यूहात राज्याचे राजकारण आता कोणत्या वळणावर जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ