मराठी रंगभूमी आणि मेकअप आर्ट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्मिता पायगुडे अंजुटे आता एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. अनुभवी थिएटर आर्टिस्ट, कुशल मेकअप आर्टिस्ट आणि ‘आयकॉन दी स्टाईल’च्या संस्थापक सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मिता यांनी त्यांच्या कलात्मक प्रवासात अनेक विविध भूमिका साकारल्या आहेत. आता त्या आगामी मराठी चित्रपट घबाडकुंड मध्ये ‘रंगी’ या गूढ आणि रहस्यमय व्यक्तिरेखेत झळकणार आहेत.
निर्माते रसिक कदम आणि प्रीतम एस.के. पाटील यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला हा चित्रपट येत्या १९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा रहस्य, भय आणि ब्लॅक मॅजिकच्या पार्श्वभूमीवर आधारित असून, त्यामध्ये ‘रंगी’ ही व्यक्तिरेखा कथानकाला वेगळीच दिशा देताना दिसणार आहे.
चित्रपटात स्मिता पायगुडे अंजुटे साकारत असलेली ‘रंगी’ ही व्यक्तिरेखा तिच्या तीक्ष्ण नजरेमुळे आणि भयावह उपस्थितीमुळे विशेष लक्ष वेधून घेणार आहे. “नजरेत धग अन् रग हिच्या अंगी, भल्या-भल्यांना घाम फोडते… नाव हिचं रंगी…!” ही टॅगलाईन तिच्या व्यक्तिमत्त्वाची झलक देणारी ठरत आहे. ब्लॅक मॅजिकशी संबंधित असलेली ही भूमिका प्रेक्षकांना एक वेगळाच थरार अनुभव देईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना स्मिता यांनी सांगितले की, ‘रंगी’ ही भूमिका त्यांच्या करिअरमधील अत्यंत खास भूमिका आहे. थिएटरमधून मिळालेला अभिनयाचा अनुभव आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून असलेली समज या व्यक्तिरेखेला प्रभावीपणे साकारण्यासाठी उपयुक्त ठरली. प्रेक्षकांना ही भूमिका दीर्घकाळ लक्षात राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.




