Raj Thackeray : “जनतेला संयमाचा सल्ला आणि नेत्यांचे भव्य ताफे?” राज ठाकरे यांच्या पत्राची जोरदार चर्चा

spot_img

पश्चिम आशियात वाढत चाललेल्या तणावामुळे जगभरात आर्थिक आणि राजकीय चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची भीती निर्माण झाल्याने इंधन, खाद्यतेल आणि सोन्याचे दर वाढू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा वापर जपून करण्याचे तसेच अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले होते.

मात्र, पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी एक खुलं पत्र लिहून सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

पत्रात राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, सामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेलची बचत करण्याचा सल्ला दिला जातो, परदेश दौरे टाळण्यास सांगितले जाते; मात्र दुसरीकडे पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोठमोठे वाहन ताफे रस्त्यावर पाहायला मिळतात. शेकडो गाड्यांसह होणाऱ्या या दौऱ्यांमधून नेमका कोणता संदेश दिला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, “सरकारने घेतलेल्या निर्णयांचा भार नेहमी सामान्य जनतेवरच का टाकला जातो?” असा प्रश्न विचारत त्यांनी केंद्राच्या धोरणांवर टीका केली आहे. “आमच्याकडूनही काही चुका झाल्या असतील आणि त्या सुधारू,” असे स्पष्टपणे सांगण्याची तयारी सरकार दाखवणार का, असा थेट सवालही त्यांनी पत्रातून केला आहे.

राज ठाकरे यांच्या या पत्रामुळे राज्यासह राष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ