रिवाबा जडेजा, अर्जुन मोधवाडिया यांच्यासह नवीन चेहरे मंत्रिमंडळात, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर यांना स्थान नाही
गुजरातमध्ये राजकीय घडामोडींनी गुरुवारी वेग घेतला, जेव्हा मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व १६ मंत्र्यांनी राजीनामे दिले. शुक्रवारी सकाळी गांधीनगर येथील महात्मा मंदिरात नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला, ज्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) गुजरातमध्ये (Gujrat) मोठे बदल घडवले. नव्या मंत्रिमंडळात १० माजी मंत्र्यांच्या जागी १९ नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्यावरही भर देण्यात आला आहे.नव्या मंत्रिमंडळात भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांची पत्नी रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) आणि माजी मंत्री मनीषा वकील (Manisha Vakil)यांना स्थान मिळाले आहे.
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले प्रमुख नेते अर्जुन मोधवाडिया यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. याशिवाय, माजी आयपीएस अधिकारी पी.सी. बरंडा आणि मोरबीचे आमदार कांतिभाई अमृतिया यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. नव्या मंत्र्यांमध्ये पुरुषोत्तम सोलंकी, कुंवरजी बावलिया, प्रफुल्ल पानशेरिया, ऋषिकेश पटेल, कानू देसाई, हर्ष संघवी, नरेश पटेल, प्रद्युम्न वाज, कौशिक वेकारिया, स्वरूपजी ठाकोर, त्रिकम छंगा, जयराम गामित, जीतू वाघाणी, दर्शनाबेन वाघेला, रमेश कटारा, ईश्वरसिंह पटेल, प्रवीण माली, डॉ. प्रद्युम्न वाजा आणि संजयसिंह महिड़ा यांचा समावेश आहे. गुजरातमध्ये मंत्रिमंडळाची कमाल संख्या २७ असू शकते. यावेळी मागील मंत्रिमंडळाच्या तुलनेत नऊ नवीन मंत्र्यांची भर पडली आहे. मात्र, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जयेश राडाडिया यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.
विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांनाही मंत्रीपदाची अपेक्षा होती, परंतु त्यांना स्थान न मिळाल्याने ते अध्यक्षपदी कायम राहतील. दुसरीकडे, माजी भाजप प्रदेशाध्यक्ष जीतू वाघाणी यांची पुन्हा मंत्रीपदी निवड झाली आहे, तर पोटनिवडणुकीत विजयी झालेले स्वरूपजी ठाकोर यांना अल्पेश ठाकोर यांच्या जागी संधी देण्यात आली आहे.या फेरबदलांमुळे गुजरातच्या राजकारणात नवीन ऊर्जा येण्याची शक्यता आहे, आणि नव्या मंत्रिमंडळाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




