पडिक्कल-कोहलीच्या शतकी भागीदारीने गुजरातचे आव्हान धुळीस
चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुजरात टायटन्सवर ५ गडी राखून सहज विजय मिळवला. गुजरातने दिलेले २०६ धावांचे डोंगरासारखे आव्हान विराटने आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर १९ व्या षटकातच पार केले. मात्र, या विजयाचा खरा टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे वॉशिंग्टन सुंदरने सोडलेला विराट कोहलीचा सोपा झेल. जर तो झेल टिपला असता, तर आरसीबीचा ‘किंग’ शून्यावरच माघारी परतला असता आणि सामन्याचे चित्र कदाचित वेगळे असते.
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना फलकावर २०५ धावांचे भक्कम लक्ष्य लावले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी बेंगळुरूला आक्रमक सुरुवातीची गरज होती. डावाच्या सुरुवातीलाच मोहम्मद सिराजने (जो काल गुजरातकडून खेळत होता) आपल्या धारदार गोलंदाजीने विराट कोहलीला चकवले. विराटने खेळलेला शॉट थेट शॉर्ट मिड-विकेटला उभ्या असलेल्या वॉशिंग्टन सुंदरच्या हातात गेला. अत्यंत सोपा वाटणारा हा झेल सुंदरच्या हातून निसटला आणि विराटला ‘लाईफलाईन’ मिळाली. या एका चुकीने गुजरातच्या हातातून सामना निसटला आणि सुंदरवर ‘व्हिलन’चा शिक्का बसला.
जीवदान मिळाल्यानंतर विराटने मागे वळून पाहिले नाही. त्याने अवघ्या ४४ चेंडूत ८१ धावांची तुफानी खेळी साकारली, ज्यात ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. आरसीबीची सुरुवात खराब झाली होती, जेकब बेथेल स्वस्तात बाद झाला, पण त्यानंतर विराट आणि देवदत्त पडिक्कल यांनी मोर्चा सांभाळला. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची निर्णायक भागीदारी केली. पडिक्कलनेही २७ चेंडूत ५५ धावांचे योगदान देत गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या विजयामुळे चिन्नास्वामीवर पुन्हा एकदा ‘आरसीबी… आरसीबी…’ असा जयघोष घुमला.




