मतदार याद्यांतील घोटाळ्यांवरून शिवसेनचे खासदार संजय राऊत संतापले
निवडणूक आयोग हा भाजपची शाखा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोपांचा मारा केला आहे. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची (BJP) एक “विस्तारित शाखा” असल्याचा थेट हल्ला त्यांनी चढवला. गेल्या दोन दिवसांत विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला भेटून मतदार याद्यांमधील गोंधळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर राऊत यांनी आज निवडणूक आयोगासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले. राऊत यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीत मतदार याद्यांमधील घोटाळ्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. “जर मतदार यादीच बोगस असेल, तर त्या यादीला काय अर्थ? मतदान प्रक्रियेत चुका असतील, तर त्याला काय किंमत?” असा सवाल त्यांनी केला. निवडणूक आयोग आमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार नसल्याचा आरोप करत, राऊत म्हणाले, “आम्ही फक्त एवढंच मागतोय की, मतदार यादी निर्दोष करा. यात काय चूक आहे?”राऊत यांनी निवडणूक आयोगाला भाजपच्या इतर संघटनांप्रमाणेच एक शाखा ठरवत गंभीर टीका केली.
“जसं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आहे, तसाच निवडणूक आयोगही भाजपचा एक भाग आहे,” असा दावा त्यांनी केला. “आमच्या काळात असं नव्हतं. जर आयोगातील लोक भाजप कार्यकर्त्यांसारखं वागत असतील, तर आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? पण मतदार याद्यांमधील गैरप्रकार आणि गुन्हेगारी कारवाया उघड करणं हे आमचं कर्तव्य आहे,” असं राऊत म्हणाले. राऊत यांनी पुढे सांगितलं की, विरोधी पक्षांनी भाजपलाही या शिष्टमंडळात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं, पण ते आले नाहीत. “निवडणूक आयोग चोर आहे आणि भाजप हा चोरांचा सरदार आहे. मग चोर चोरांना कसं भेटणार?” असा खोचक टोला त्यांनी लगावला.
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीला “महा कन्फ्युज आघाडी” म्हणत टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना राऊतांनी फडणवीसांवरही निशाणा साधला. “फडणवीसांचे पंजोबा नाना फडणवीसही असंच गोंधळ निर्माण करणारी वक्तव्यं करायचे. पेशवाईच्या कागदपत्रांवरून हे दिसतं. पेशवाईत साडेतीन शहाणे होते, त्यात फडणवीस अर्धे शहाणे होते, म्हणूनच पेशवाई बुडाली. आणि आताचे फडणवीस तर त्याहूनही कमी शहाणे वाटतात,” असा टोमणा राऊतांनी मारला. ते पुढे म्हणाले, “फडणवीस वकील आहेत आणि भाजपचे नेते आहेत, म्हणून आम्ही त्यांना निमंत्रित केलं होतं. आम्ही निवडणूक आयोगासमोर मांडलेले मुद्दे त्यांच्या काळजात घुसले आहेत. तुम्ही चोऱ्या करता, घोटाळे करता आणि बोगस मतदानाने निवडणुका जिंकता, यात कन्फ्युजन काय आहे, मिस्टर फडणवीस?” असा थेट सवाल त्यांनी विचारला.
“फडणवीसांसारखा गोंधळलेला मुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाला नाही. यांना वकील कोणी बनवलं आणि यांनी वकिली कुठे केली, हे समजतच नाही. नरेंद्र मोदींच्या कृपेने जे मुख्यमंत्री झाले, त्यात फडणवीस एक आहेत. कर्तृत्वावर ते मुख्यमंत्री झालेले नाहीत,” अशी बोचरी टीका राऊतांनी केली.




