भाजपच्या ‘जनआक्रोश’ मोर्चावरूनही सरकारला घेरले; महाजनांच्या विधानाचा घेतला समाचार
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (MSC Bank) कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांना मिळालेली क्लीनचिट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, या क्लीनचिटमागे मोठे राजकीय गणित असल्याचे सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचेही नाव आहे. त्यांना कायदेशीर कचाट्यातून मुक्त करायचे असेल, तर रोहित पवारांनाही क्लीनचिट देणे सरकारची मजबुरी होती,” असे विधान राऊत यांनी केले आहे. ‘बिटविन द लाईन्स’चा उलगडा करताना राऊत यांनी थेट सुनेत्रा पवारांकडे अंगुलीनिर्देश केल्याने या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, शिखर बँक घोटाळ्यात ज्या महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत, त्यात सुनेत्रा पवार यांचाही समावेश आहे. जर त्यांना या प्रकरणातून बाहेर काढायचे असेल, तर त्याच केसमध्ये असलेल्या इतर आरोपींना, विशेषतः रोहित पवारांना आरोपी म्हणून ठेवता येत नाही. म्हणूनच केवळ सुनेत्रा पवारांच्या सुटकेसाठी रोहित पवारांनाही या दिलासादायक निर्णयाचा फायदा मिळाला आहे, असा दावा राऊत यांनी केला. या विधानामुळे सत्ताधारी महायुती आणि विशेषतः पवार कुटुंबात काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घोटाळ्याच्या प्रकरणासोबतच राऊत यांनी भाजपच्या मुंबईतील ‘जनआक्रोश’ मोर्चावरूनही मंत्री गिरीश महाजन आणि सरकारवर जोरदार प्रहार केला. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने काढलेल्या या मोर्चात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकर त्रस्त झाले होते. त्यावर गिरीश महाजन यांनी दिलेल्या “५० किलोमीटरचे हायवे जॅम झालेले पाहिलेत” या विधानाचा राऊतांनी निषेध केला. “ज्या महिलेने गिरीश महाजनांना फटकारले, ती शेकडो त्रस्त मुंबईकरांची प्रतिनिधी आहे. भाजप स्वतःच मोर्चाचे आयोजन करते आणि स्वतःविरुद्धच गुन्हे दाखल करण्याची भाषा करते, हे हास्यास्पद आहे. खोटे विषय उकरून काढून जनतेला वेठीस धरणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी,” अशा कडक शब्दांत राऊतांनी भाजपला सुनावले. तसेच, विरोधकांना मोर्चासाठी महिनाभर चकरा माराव्या लागतात आणि सत्ताधाऱ्यांना २४ तासांत परवानगी कशी मिळते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.




