लैंगिक छळ, अश्लील शेरेबाजी आणि गर्भपातासारख्या संवेदनशील विषयावर अश्लील टिप्पणी; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिकमधील नामांकित टीसीएस (TCS) कंपनीच्या कार्यालयातून माणुसकीला काळिमा फासणारे वास्तव समोर आले आहे. गेल्या ११ वर्षांपासून कंपनीत एकनिष्ठतेने काम करणाऱ्या आणि सध्या ‘टीम लीडर’ पदावर असलेल्या एका पीडित महिलेने आरोपींच्या छळाचा पाढाच पोलिसांसमोर वाचला आहे. तब्बल ४ वर्षं तिला लैंगिक छळ, अश्लील शेरेबाजी आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागला. आरोपींनी केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांनाच नाही, तर वरिष्ठ पदावर असलेल्या महिलांनाही आपल्या अश्लील कृत्यांचे लक्ष्य बनवल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही व्यवस्थापनाने आरोपींवर ठोस कारवाई न केल्याने या टोळीची मजल अधिकच वाढल्याचा खळबळजनक आरोप पीडितेने केला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या जबाबानुसार, दानिश शेख, तौसीफ शेख, रझा मेमन, शफी शेख, शाहरुख कुरेशी आणि आसिफ अन्सारी या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात एक ‘टोळी’ तयार केली होती. हे लोक जाणूनबुजून इतर धर्मीय कर्मचाऱ्यांचा छळ करणे, मूर्तींबद्दल अपमानजनक बोलणे आणि महिला कर्मचाऱ्यांना अश्लील नजरेने न्याहाळणे असे प्रकार करत असत. २०१२ पासून सुरू झालेला हा प्रकार फेब्रुवारी २०२६ पर्यंत अविरत सुरू होता. २०२२ मध्ये एका मिटिंग दरम्यान आरोपी शफी शेख याने पीडितेकडे अत्यंत अश्लील नजरेने पाहून तिला अस्वस्थ केले. याप्रकरणी ईमेलद्वारे तक्रार करूनही कंपनीने केवळ आरोपीचा विभाग बदलण्यापलीकडे काहीच केले नाही, ज्यामुळे त्याला अधिकच मोकळे रान मिळाले.
या छळाची परिसीमा तेव्हा गाठली गेली, जेव्हा फेब्रुवारी २०२६ मध्ये पीडितेच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःखावरही आरोपींनी अश्लील टिप्पणी केली. नुकताच गर्भपात झाल्यामुळे खचलेल्या पीडितेला आरोपी तौसीफ अत्तार याने विचित्र नजरेने पाहत ‘अजमेरच्या मौलवी’कडे जाण्याचा सल्ला दिला. एखाद्या स्त्रीच्या अत्यंत संवेदनशील आणि खाजगी आयुष्याचा असा बाजार मांडल्याने पीडितेने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. कंपनीच्या नाशिक सेंटरमध्ये महिलांचे कपडे, रूप आणि शरीराचे अवयव यावर टिप्पणी करणे ही जणू सामान्य बाब झाली होती, असेही तिने नमूद केले आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




