निसर्ग सौंदर्याचा विळखा की महागाईचा फास? एकाच वर्षात ७१ हजार किवी नागरिकांनी फिरवली पाठ; ऑस्ट्रेलियाकडे वाढला ओढा
बर्फाच्छादित डोंगररांगा, निळेभोर आकाश आणि लॉर्ड ऑफ द रिंग्समधील जादूई हिरवळ असलेला न्यूझीलंड हा देश सध्या एका भीषण संकटाचा सामना करत आहे. ज्या देशाला आपण ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ मानतो आणि जिथे स्थायिक होण्याचे स्वप्न अनेक जण पाहतात, त्याच देशातील नागरिक आता वेगाने आपल्या सुटकेस पॅक करत आहेत. गेल्या केवळ १२ महिन्यांत तब्बल ७१ हजार नागरिकांनी न्यूझीलंडला ‘बाय-बाय’ केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे स्थलांतर केवळ पर्यटनासाठी किंवा अनुभवासाठी नसून, ते कायमस्वरूपी देश सोडण्यासाठी आहे. कोरोनापूर्व काळात हा आकडा केवळ ३ हजारांच्या आसपास होता, जो आता थेट १.४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे.
न्यूझीलंडमधील ही गळती केवळ तरुण वर्गापुरती मर्यादित नाही, तर २० ते ३० वर्षांचा अनुभव असलेले अनुभवी प्रोफेशनल्सही देश सोडून जात आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढती महागाई आणि कमी पगार. न्यूझीलंडमधील बेरोजगारीचा दर गेल्या १० वर्षांतील सर्वोच्च स्तरावर (३.५%) पोहोचला असून जीडीपीची वाढ जेमतेम १ टक्क्यावर रेंगाळत आहे. किराणा मालाचे दर आणि घरांचे भाडे गगनाला भिडले असताना पगारवाढ मात्र शून्य आहे. अशा परिस्थितीत चांगले जीवनमान आणि मोठ्या पॅकेजच्या शोधात तब्बल ६० टक्के नागरिक शेजारच्या ऑस्ट्रेलियाला पसंती देत आहेत.
ऑस्ट्रेलिया सध्या न्यूझीलंडसाठी सर्वात मोठा ‘मॅग्नेट’ ठरत आहे. तिथली अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून पगारही न्यूझीलंडच्या तुलनेत दुप्पट आहेत. ऑस्ट्रेलियात एका नर्सला वर्षाला ५० लाख रुपयांचे पॅकेज मिळते, तर पोलिसांना महिन्याला ७५ हजार डॉलर आणि स्वस्त घरांचे आश्वासन दिले जात आहे. परिणामी, गेल्या अडीच वर्षांत न्यूझीलंडमधील १० हजार परिचारिका आणि शेकडो पोलिसांनी आपली वर्दी बदलून ऑस्ट्रेलियाची वाट धरली आहे. तस्मान समुद्र ओलांडून ७ लाखाहून अधिक न्यूझीलंडवासी ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले असून, हे महा-पलायन न्यूझीलंडच्या भविष्यकाळासाठी एक मोठे आव्हान उभे करत आहे.




