बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचे कमबॅक; केवळ पाच दिवसांत जगभरात शंभर कोटींची कमाई करत हॉरर-कॉमेडीचा जलवा कायम
गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाचे वादळ असतानाच, अक्षय कुमारने आपल्या ‘भूत बंगला’ या चित्रपटाद्वारे जोरदार एन्ट्री केली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ‘धुरंधर २’ च्या लाटेत हा चित्रपट टिकेल का, अशी शंका अनेक व्यापार विश्लेषकांनी व्यक्त केली होती. मात्र, तब्बल १४ वर्षांनंतर एकत्र आलेल्या प्रियदर्शन आणि अक्षय कुमार या ‘हिट’ जोडीने पुन्हा एकदा जादू केली आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादाच्या जोडीलाच या चित्रपटाने पेड प्रीव्ह्यूसह १६ कोटी रुपयांची धडाकेबाज सलामी दिली. प्रदर्शनाच्या पहिल्या पाच दिवसांतच या चित्रपटाने भारतीय बाजारपेठेत ७१.५७ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, ‘भूत बंगला’ने पहिल्या दिवशी १२.२५ कोटी आणि त्यानंतर शनिवार-रविवारी अनुक्रमे १९ आणि २३ कोटी रुपयांची दमदार कमाई केली. सोमवारी आणि मंगळवारी कमाईचा आकडा थोडा स्थिरावला असला, तरी मंगळवारी ११ हजारांहून अधिक शोजद्वारे चित्रपटाने ६.८२ कोटींचा गल्ला जमवला. विशेष म्हणजे, भारताबाहेरील कमाईसह या चित्रपटाने जगभरात १०० कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. १२० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट लवकरच आपला खर्च वसूल करून नफ्याच्या दिशेने वाटचाल करेल, अशी चिन्हे दिसत आहेत. भारतातील ग्रॉस कलेक्शनचा आकडा आता ८५ कोटींच्या पार गेला आहे.
‘भूल भुलैया’च्या यशानंतर पुन्हा एकदा अक्षय कुमार हॉरर-कॉमेडी प्रकारात यशस्वी ठरताना दिसत आहे. या चित्रपटात अक्षयसह परेश रावल, राजपाल यादव, तब्बू आणि जिशू सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज आहे. प्रियदर्शन यांच्या खास शैलीतील विनोद आणि भीतीचा तडका प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरला आहे. ‘हेरा फेरी’ आणि ‘भागम भाग’ फेम या जोडीचा हा नवा प्रयोग पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर ‘पैसा वसूल’ ठरत आहे.




