भारतीय संगीत क्षेत्रातील एक देदीप्यमान तारा निखळला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी १२ एप्रिल रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने केवळ भारतच नव्हे, तर जागतिक संगीत विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आशाजींच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला असताना, प्रसिद्ध गायक सोनू निगम याने मात्र एक वेगळा आणि सकारात्मक विचार मांडला आहे. सोनूच्या मते, आशाजींच्या जाण्याकडे केवळ दु:खाच्या नजरेतून पाहण्याऐवजी, त्यांनी जे ९२ वर्षांचे समृद्ध आणि यशस्वी आयुष्य जगले, त्याचा एक ‘उत्सव’ म्हणून विचार केला पाहिजे.
सोनू निगमने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, शेवटच्या श्वासापर्यंत संगीत क्षेत्रात सक्रिय राहणे ही गोष्ट अत्यंत दुर्मिळ आहे. त्यांनी इतर कलाकारांसाठी यशाचे जे मापदंड ठरवले आहेत, ते प्रेरणादायी आहेत. त्यामुळे लोकांनी विलाप करण्यापेक्षा त्यांच्या ऐतिहासिक प्रवासाबद्दल आदर आणि सन्मान व्यक्त करावा. त्यांच्या निधनाने जरी एका सुवर्ण युगाचा अंत झाला असला, तरी त्यांचे गाणे आणि त्यांचे व्यक्तिमत्व भारतीय संगीताला कायम नवी दिशा देत राहील. प्रत्येक कलाकाराला आशाजींसारखे दीर्घ आणि अर्थपूर्ण आयुष्य मिळावे, असे स्वप्न असते, असेही सोनूने नमूद केले.
आशाजींचे निधन मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे झाले असून त्यांच्या पार्थिवावर १३ एप्रिल रोजी मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर भोसले कुटुंबीयांनी वाराणसी येथे पवित्र गंगा नदीत त्यांच्या अस्थींचे विसर्जन केले. यावेळी त्यांची नात जनाई भोसले ही अत्यंत भावूक झाली होती. जनाईने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आजीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. “माझी आजी लोकांच्या प्रेमास आणि आदरास पात्र होती, ती आपल्या सर्वांच्या हृदयात गाण्याच्या रूपाने कायम जिवंत राहील,” अशा शब्दांत जनाईने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.




