पश्चिम बंगाल मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कडक निर्बंध लागू केले आहेत. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यात 152 जागांवर मतदान होणार असून, त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आयोगाने राज्यात दुचाकी वाहनांच्या वापरावर मर्यादा घातल्या असून, विशेषतः ‘डबल सीट’ बसण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, निवडणुकीदरम्यान होणाऱ्या बाईक रॅलींनाही स्पष्टपणे मनाई करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रिया शांततापूर्ण आणि सुरळीत पार पडावी, या उद्देशाने हे निर्बंध लागू करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. रात्रीच्या वेळी अनावश्यक हालचालींवरही नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हे सर्व आदेश 21 एप्रिलपासून अंमलात आले असून, प्रशासन त्याची काटेकोर अंमलबजावणी करत आहे.
दरम्यान, या निर्णयावर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या निर्णयावर टीका केली आहे. त्यांनी हा निर्णय अत्यंत हास्यास्पद असल्याचं म्हटलं असून, अशा प्रकारचे निर्णय घेतल्याने मुहम्मद बिन तुघलक यांची आठवण येते, असा टोला लगावला.
तसेच, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदारांना अप्रत्यक्षपणे अडचणीत टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपला पराभवाची भीती वाटत असल्यामुळे असे निर्णय घेतले जात आहेत, असा दावा करत त्यांनी मतदारांना मतदानाद्वारे उत्तर देण्याचं आवाहन केलं. या सर्व घडामोडींमुळे पश्चिम बंगालमधील निवडणूक वातावरण अधिकच तापले आहे.




