शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; सुदेश भोसले आणि शान यांनी स्वरांजली वाहत दिला अखेरचा निरोप
भारतीय संगीत क्षेत्रातील एक देदीप्यमान तारा निखळला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, आणि एका सुवर्णयुगाचा अंत झाला. त्यांच्या निधनामुळे केवळ मनोरंजन विश्वच नव्हे, तर जगभरातील त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले आहेत. आशा दीदींच्या जाण्याने त्यांची नात जनाई भोसले ही पूर्णपणे खचून गेली असून, तिने सोशल मीडियावर आपल्या आजीबद्दल व्यक्त केलेल्या भावना सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या आहेत.
मंगळवारी समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये जनाई आपल्या लाडक्या आजीला अखेरचा निरोप देताना अत्यंत भावूक झालेली दिसली. तिने इन्स्टाग्रामवर आजीसोबतचा एक गोड फोटो शेअर करत, “गुडबाय माय लव्ह, माझ्या आयुष्यातील प्रेम,” अशा शब्दांत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आजीवर प्रेम करणाऱ्या आणि तिला अखेरचा सन्मान देण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे तिने मनापासून आभार मानले आहेत. आजी कायम आपल्या हृदयात जिवंत राहील, असा विश्वासही तिने यावेळी व्यक्त केला.
सोमवारी संध्याकाळी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत आशा दीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. चिरंजीव आनंद भोसले यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी साश्रू नयनांनी निरोप देताना गायक सुदेश भोसले आणि शान यांनी आपल्या सुरांच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण स्वरांजली वाहिली. आशा दीदी जरी शारीरिक रूपाने आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या जादुई आवाजाच्या रूपाने त्या पिढ्यानपिढ्या संगीतप्रेमींच्या मनात घर करून राहतील.




