Rohit Pawar : “भोंदूबाबाकडे बड्या नेत्यांचेही आक्षेपार्ह व्हिडिओ”, रोहित पवारांचा राजकीय बॉम्बगोळा

spot_img

एसआयटी चौकशीवर दबाव असल्याचा खळबळजनक आरोप; खरातच्या जमिनी विकून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याची मागणी

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक अत्याचार आणि हनीट्रॅप प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली असतानाच, आता या वादात राजकीय ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाला थेट राजकीय वळण दिले असून, खरातकडे केवळ सामान्य नागरिकांचेच नव्हे तर अनेक बड्या राजकीय नेत्यांचेही आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणातील ३५ हनीट्रॅप प्रकरणांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि संबंधित व्हिडिओ बाहेर कसे आले, यात कोणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत, याचा छडा लावण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे.

रोहित पवारांनी या प्रकरणाच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना तपास यंत्रणांवर दबाव असल्याचा संशय व्यक्त केला आहे. “काही अधिकारी गप्प का आहेत? काही नेत्यांचे व्हिडिओ दाबले जात आहेत का?” असा सवाल विचारत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. मित्रपक्षांना अडचणीत आणण्यासाठी अशा व्हिडिओंचा वापर करण्याची भाजपची जुनी पद्धत असल्याचे सांगत त्यांनी नितीश कुमार आणि सातारा प्रकरणांचे दाखले दिले. एसआयटीचा (SIT) वापर केवळ सिस्टीम साफ करण्यासाठी व्हावा, कोणाचे गुन्हे लपवण्यासाठी नको, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली आहे.

केवळ हनीट्रॅपच नव्हे, तर अशोक खरातच्या आर्थिक साम्राज्यावरही पवारांनी बोट ठेवले आहे. समृद्धी महामार्गाचा मार्ग कसा असेल, याची गुप्त माहिती खरातला आधीच मिळाली होती आणि त्यातून त्याने मोठ्या प्रमाणावर जमिनींची खरेदी-विक्री केल्याचा आरोप त्यांनी केला. खऱ्या शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गाला विरोध असताना अशा भोंदूबावांनी राजकीय आशिर्वादाने स्वतःचा फायदा करून घेतल्याचे ते म्हणाले. “खरातच्या सर्व जमिनी जप्त करून त्या विकल्या जाव्यात आणि त्यातून येणारा पैसा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करावा,” अशी महत्त्वाची मागणी करत त्यांनी या प्रकरणाची व्याप्ती वाढवली आहे. आता एसआयटी या राजकीय नेत्यांच्या नावांचा खुलासा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ