Sanjay Raut : “पवारांची पुण्याईच आडनावाचे वलय”, संजय राऊतांचा विरोधकांना जोरदार टोला

spot_img

अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी रणधुमाळी; सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने आता राजकीय वळण घेतले आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या असून, त्यांच्या प्रचाराची धुरा पवार कुटुंबीय सांभाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना पवार कुटुंबातील वारसाहक्कावरून विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. राऊत म्हणाले की, “आज तुम्ही मोदी-शहांच्या जीवावर उभे असाल, पण जर शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर आज कोणत्याही पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात स्थान मिळाले नसते.”

संजय राऊत यांनी यावेळी कृतज्ञतेचा मुद्दा उपस्थित करत शरद पवारांच्या योगदानाची आठवण करून दिली. “बारामती म्हणजे शरद पवार हे समीकरण कधीही पुसता येणार नाही. ज्याप्रमाणे शिवसेना प्रमुखांनी ठाकरे नावाला वलय दिले, तसेच वलय शरद पवारांनी पवार आडनावाला मिळवून दिले आहे. त्यांच्या अस्तित्वाशिवाय कुणाचेही राजकारण शक्य नाही,” असे सांगत त्यांनी अजित पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पुढील पिढीला शरद पवारांच्या पुण्याईची जाणीव करून दिली. माणसाने आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या वैभवाचा विसर पडू देऊ नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

या पोटनिवडणुकीकडे एक ‘श्रद्धांजली’ म्हणून पाहिले जात असल्याचे सांगताना राऊतांनी भाजपवर तिरकस निशाणा साधला. “अजित दादांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अधुरे राहिले, मात्र भाजप आता एकनाथ शिंदेंऐवजी सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार आहे का?” असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. जर देवेंद्र फडणवीस सुनेत्रा पवारांना वारसदार म्हणून निवडणार असतील, तर तो भाजपचा मोठेपणा ठरेल, असे म्हणत त्यांनी महायुतीमधील अंतर्गत समीकरणांवर भाष्य केले. या निवडणुकीत जय-पराजय होतच राहतील, पण बारामतीमध्ये फक्त शरद पवारांचीच पुण्याई चालते, असा ठाम विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ