Karuna Munde : “चाकणकरांचे खरातशी आर्थिक संबंध”, मुंडेंच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

spot_img

राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे उघडकीस येत असतानाच, आता या प्रकरणाला तीव्र राजकीय वळण मिळाले आहे. स्वराज्य शक्ती सेनेच्या नेत्या करुणा मुंडे यांनी याप्रकरणी अत्यंत खळबळजनक दावे करत थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. “रुपाली चाकणकर यांचे खरातसोबत जवळचे संबंध असून त्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत,” असा गंभीर आरोप मुंडे यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, “सुनेत्रा पवार यांनी तातडीने चाकणकर यांची पक्षातून हकालपट्टी करायला हवी होती,” अशी मागणी करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडवून दिली आहे.

करुणा मुंडे यांनी खरातच्या सुरक्षेबाबतही मोठी भीती व्यक्त केली आहे. “खरातला अनेक मोठ्या धेंड्यांची नावे माहिती आहेत, त्यामुळे जेलमध्ये त्याचा ‘एपस्टिन’सारखा खून होऊ शकतो,” असा खळबळजनक संशय त्यांनी बोलून दाखवला. या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकर यांना केवळ पदावरून दूर करू नये, तर त्यांना या गुन्ह्यात ‘सह-आरोपी’ करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

दुसरीकडे, राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मुंडे यांनी महाविकास आघाडीवरही टीकास्त्र सोडले. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत असे जर नाना पटोले म्हणत असतील, तर काँग्रेस त्यांच्यासोबत इतके दिवस का राहिली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, आगामी राहुरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण लवकरच सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेणार असल्याचे सांगत, त्यांनी आपल्या भविष्यातील राजकीय चालींचे संकेत दिले आहेत. एकूणच खरात प्रकरणावरून सुरू झालेले हे आरोप-प्रत्यारोप आता थेट सत्तेच्या केंद्रस्थानी जाऊन धडकले आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ