Kunal Kamra : कुणाल कामराची विशेषाधिकार समितीसमोर ठाम भूमिका; ‘मी चुकीचा नाही’

spot_img

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित ‘ठाणे की रिक्षा’ या गाण्यामुळे चर्चेत आलेल्या स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी गुरुवारी विधिमंडळाच्या विशेषाधिकार समितीसमोर आपली बाजू मांडली. या वेळी त्यांनी आपण कोणतीही चूक केलेली नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.

कामरा यांनी आपल्या साक्षीत हे गाणे त्यांच्या व्यावसायिक कामाचा भाग असून त्यामध्ये व्यंगात्मक अभिव्यक्ती असल्याचे नमूद केले. समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत ही सुनावणी पार पडली. या बैठकीदरम्यान भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि कामरा यांच्यात थेट चर्चा देखील झाली.

सुनावणीदरम्यान मराठीत विचारलेले प्रश्न समजून घेण्यासाठी कामरा यांनी भाषांतरकाराची मदत घेतली. भाषांतरानंतरच त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर आपली भूमिका मांडली.

यावेळी समितीकडून त्यांना बिनशर्त माफी मागण्यास सांगण्यात आले होते. मात्र, यावर आपण आपल्या वकिलामार्फत उत्तर देऊ असे कामरा यांनी स्पष्ट केले. सुनावणीनंतर प्रसाद लाड यांनी सांगितले की, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी समितीने कामरांकडून काही अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली आहे.

सुनावणीदरम्यान कामरांचे वर्तन नम्र असल्याचेही लाड यांनी नमूद केले. आता सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या कृतीत विशेषाधिकार भंग झाला आहे की ती व्यावसायिक व्यंगात्मक अभिव्यक्ती आहे, यावर समिती निर्णय घेणार आहे.

दरम्यान, सुषमा अंधारे यांच्याविरोधातील हक्कभंग प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव पुढील तारीख नंतर निश्चित केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ