ज्येष्ठ अभिनेते भीम वकानी यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात दुःखाची लाट पसरली आहे. ते लोकप्रिय अभिनेत्री दिशा वकानी यांचे वडील होते. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी त्यांच्या निधनाची माहिती देत श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, भीम वकानी यांची तब्येत गंभीर नव्हती, मात्र सकाळी अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.
भीम वकानी हे केवळ अभिनेतेच नव्हते, तर ते एक उत्तम चित्रकार आणि दिग्दर्शक म्हणूनही ओळखले जात होते. मुलगी दिशा वकानीच्या अभिनय कारकिर्दीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक वर्ष काम करत विविध भूमिका साकारल्या. लगान, हम दिल दे चुके सनम आणि देवदास यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. या चित्रपटांत त्यांनी आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं.
चित्रपटांव्यतिरिक्त ते गुजराती रंगभूमी आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातही सक्रिय होते. पडद्यावर आणि पडद्यामागे त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं.
दरम्यान, दिशा वकानी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत ‘दयाबेन’च्या भूमिकेमुळे घराघरात प्रसिद्ध झाल्या. 2018 मध्ये प्रसूती रजेवर गेल्यानंतर त्या मालिकेत परतल्या नाहीत. त्यांच्या पुनरागमनाबाबत अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहेत.
असित मोदी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, विवाह आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे पुनरागमन कठीण वाटत असले तरी ते अजूनही आशावादी आहेत. दिशा वकानी पुन्हा मालिकेत दिसल्या तर चाहत्यांसाठी तो आनंदाचा क्षण ठरेल, अन्यथा नव्या ‘दयाबेन’चा शोध घ्यावा लागेल.




