पाचवीतल्या इशितचं उर्मट वागणं आणि दोन वर्षांपूर्वी विराटचा अतिआत्मविश्वास; दोघांनाही रिकाम्या हातानं परतावं लागलं‘
कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो सध्या त्याच्या 17व्या पर्वात चर्चेत आहे, पण यावेळी कारण आहे पाचवीत शिकणारा इशित भट्ट (Ishit Bhatt). या चिमुरड्याने शोच्या होस्ट, बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत केलेलं उद्धट आणि उर्मट वर्तन. इशितचा अतिशहाणपणा आणि बेफिकीर बोलणं यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याच्यासह त्याच्या पालकांवरही टीकेची झोड उठवली. इशितचा अवास्तव आत्मविश्वास त्याला महागात पडला आणि त्याला शोमधून रिकाम्या हातानं परतावं लागलं.पण, असं काही पहिल्यांदाच घडलं असं नाही.
दोन वर्षांपूर्वी, 2023 मध्ये ‘केबीसी 15’च्या नोव्हेंबरच्या भागात असाच एक प्रसंग घडला होता. तेव्हा 8 वर्षांचा विराट अय्यर (Virat Iyer) हॉटसीटवर बसला होता. शाळेत ‘गुगल बॉय’ म्हणून ओळखला जाणारा हा मुलगा हुशारीने सगळ्यांना थक्क करत एक कोटींच्या टप्प्यापर्यंत पोहोचला. पण, याचवेळी त्याचा आत्मविश्वास अतिआत्मविश्वासात बदलला. एका चुकीच्या निर्णयामुळे त्याने मिळवलेली 50 लाखांची रक्कम गमावली आणि केवळ 3 लाख 20 हजार रुपये घेऊन घरी परतला.
विराटसमोर आलेला एक कोटींचा प्रश्न त्याने चुकवला. त्याच्याकडे कोणतीही लाइफलाइन शिल्लक नव्हती. त्याने उत्तर दिलं ‘नोबेल पारितोषिक विजेते’, पण बरोबर उत्तर होतं ‘महिला शास्त्रज्ञ’. जर त्याने त्या टप्प्यावर खेळ सोडला असता, तर तो 50 लाख रुपये घेऊन गेला असता. पण त्याच्या अतिआत्मविश्वासाने त्याला रिकाम्या हातानं परतण्यास भाग पाडलं. अमिताभ बच्चन यांनी त्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक केलं, पण त्याचवेळी त्याला योग्यवेळी खेळ सोडण्याचा सल्लाही दिला.इशित आणि विराटच्या या कहाण्यांमधून एकच धडा मिळतो आत्मविश्वास महत्त्वाचा असला, तरी अतिआत्मविश्वास आणि उर्मटपणा कधीकधी महागात पडतो.




