महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिने आपल्या खास अंदाजाने आणि दमदार स्टेज परफॉर्मन्समुळे अल्पावधीतच मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असून, तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो. स्टेज शोबरोबरच तिने अनेक गाण्यांच्या अल्बममध्येही काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आता गौतमीने आपल्या चाहत्यांसाठी एक खास सरप्राईज देत ‘श्री कृष्ण सावळा रे’ हे नवीन गाणं सादर केलं आहे. हे गाणं भक्ती, प्रेम आणि समर्पणाचा सुंदर मिलाफ दाखवतं. विशेष म्हणजे, या गाण्यात राधिकेच्या नजरेतून भगवान श्रीकृष्णाविषयी असलेलं प्रेम अतिशय भावपूर्ण पद्धतीने मांडण्यात आलं आहे.
या गाण्यात गौतमीने सादर केलेलं नृत्य विशेष लक्षवेधी ठरत आहे. तिच्या अभिव्यक्तीतून राधिकेच्या भावना जिवंत झाल्यासारख्या वाटतात. नृत्यातील प्रत्येक हालचालीतून कृष्णावरील प्रेम स्पष्टपणे जाणवतं, ज्यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत.
या गाण्यात गौतमीच्या नृत्याला अधिक खुलवण्याचं काम सिनेनृत्यदिग्दर्शक देवेंद्र शेलार यांनी केलं आहे. तसेच या गाण्याची निर्मिती संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर यांनी केली आहे. गाण्याचे बोल अवंतिका बहिरट यांनी लिहिले असून, या ह्रदयस्पर्शी शब्दांना आदित्य पाटेकर यांच्या सुरेल संगीताची जोड लाभली आहे. यूट्यूबवर रिलीज झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, गौतमी पुन्हा एकदा आपल्या अनोख्या सादरीकरणामुळे चर्चेत आली आहे.




