Deool Band 2 : स्वामी समर्थांचा महिमा पुन्हा मोठ्या पडद्यावर! विज्ञानाला मिळणार अध्यात्माचं उत्तर

spot_img

११ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘देऊळ बंद’चा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला; २१ मे २०२६ ला ‘स्वामी’ पुन्हा येणार!

मराठी चित्रपटसृष्टीत विज्ञान आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम घडवून आणणारा ‘देऊळ बंद’ हा चित्रपट ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ‘विश्वरूप’ धारण करण्यासाठी सज्ज झाला आहे. २०१५ मध्ये ज्या चित्रपटाने विज्ञानाच्या कसोटीवर अध्यात्माचं सत्य अधोरेखित केलं, त्या ‘देऊळ बंद’च्या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अष्टपैलू चित्रपटकार प्रविण विठ्ठल तरडे यांनी ‘देऊळ बंद २’ चे डिजिटल पोस्टर सोशल मीडियावर झळकावत प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे. “आता परीक्षा देवाची…” ही थरारक टॅगलाईन असलेल्या या पोस्टरने चित्रपटप्रेमींमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण केलं असून, हा चित्रपट २१ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

मराठी बॉक्स ऑफिसवर यशाचे समीकरण मांडणारे प्रविण तरडे यांचा हा सहावा मोठा प्रोजेक्ट असणार आहे. ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ यांसारख्या ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर हुकूमत गाजवल्यानंतर तरडे पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचा आणि विज्ञानाच्या संघर्षाचा नवा पैलू मांडणार आहेत. पहिल्या भागात वैज्ञानिक आणि स्वामी महाराज यांच्यातील संवाद प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून गेले होते, आता दुसऱ्या भागात देवाला नेमकी कसली परीक्षा द्यावी लागणार, हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. वटवृक्ष एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या भव्य चित्रपटाची निर्मिती कैलास वाणी आणि त्यांच्या कुटुंबाने केली आहे.

चित्रपटातील कलाकारांची फौज अद्याप गुलदस्त्यात असली तरी, पहिल्या भागातील गश्मीर महाजनी आणि मोहन जोशी यांच्यासारख्या दिग्गज जोडीची जादू पुन्हा पाहायला मिळणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या तरी केवळ डिजिटल पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख समोर आली असली, तरी प्रविण तरडे यांच्या लेखणीतून उतरलेला हा ‘अध्यात्मिक मास्टरपीस’ बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक करेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. स्वामी भक्तांसाठी २१ मे २०२६ हा दिवस खऱ्या अर्थाने सिने-उत्सव ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ