इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली जागतिक बाजारपेठेत खळबळ; डॉलर वधारल्याने मौल्यवान धातूंवर विक्रीचा दबाव
आज शुक्रवारी (३ एप्रिल) ‘गुड फ्रायडे’च्या मुहूर्तावर भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर झाला असून, देशातील प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १.५० लाख रुपयांच्या खाली आला आहे. राजधानी दिल्लीत सोन्याचे दर सुमारे ३५०० रुपयांनी कोसळून १,४९,११० रुपयांवर पोहोचले आहेत, तर मुंबईत हाच भाव १,४८,९६० रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचे दर प्रति औंस ४,५९१.५२ डॉलर इतके असून, अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किमतीवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
बाजारातील या अस्थिरतेमागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणवरील संभाव्य हल्ल्याचे संकेत हे मुख्य कारण मानले जात आहे. ट्रम्प यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यांत मोठ्या कारवाईचा इशारा दिल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. तसेच, डॉलर इंडेक्स ०.५ टक्क्यांनी वधारल्याने परकीय व्यापारात सोन्याची मागणी घटली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी तेल आणि वायूची वाहतूक विस्कळीत होण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, ज्याचा परिणाम थेट कमोडिटी मार्केटवर दिसून येत आहे.
प्रमुख शहरांमधील आजचे दर (प्रति १० ग्रॅम):
| शहर | २४ कॅरेट सोने | २२ कॅरेट सोने |
|---|---|---|
| दिल्ली | १,४९,९१० रुपये | १,३६,६९० रुपये |
| मुंबई / पुणे | १,४८,९६० रुपये | १,३६,५४० रुपये |
| चेन्नई | १,४९,९९० रुपये | १,३७,४९० रुपये |
| कोलकाता / बंगळुरू | १,४८,९६० रुपये | १,३६,५४० रुपये |
सोन्यापाठोपाठ चांदीनेही आज गुंतवणूकदारांना मोठा झटका दिला आहे. ३ एप्रिलच्या सकाळी चांदीचा भाव प्रति किलो २,४९,९०० रुपयांपर्यंत खाली आला. विशेष म्हणजे, आदल्या दिवशी दिल्लीच्या बाजारात चांदी तब्बल ९००० रुपयांनी म्हणजेच ३.६६ टक्क्यांनी घसरली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव सध्या ६९.५७ डॉलर प्रति औंस आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये चांदीने ४ लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता, मात्र आता जागतिक दबावामुळे किमतीत लक्षणीय घट होताना दिसत आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे बाजारपेठेत अनिश्चितता कायम असून, जोपर्यंत इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष निवळत नाही, तोपर्यंत मौल्यवान धातूंच्या किमतीत असेच चढ-उतार पाहायला मिळतील.




