Rajesh Khanna : राजेश खन्ना यांच्यासोबतच्या ‘त्या’ नात्याला लग्नाची मान्यता नाही; अनिता अडवाणींना हायकोर्टाचा मोठा दणका

spot_img

अक्षय कुमार आणि कपाडिया कुटुंबाला दिलासा: १२ वर्षांच्या सहवासाचा दावा न्यायालयाने फेटाळला

दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या जीवनातील वादग्रस्त प्रकरणांपैकी एक असलेल्या अनिता अडवाणी यांच्या कायदेशीर लढ्याला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. राजेश खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेवर आणि नात्यावर हक्क सांगणाऱ्या अनिता अडवाणी यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने २०१७ मधील दिंडोशी दिवाणी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत, अनिता यांचा राजेश खन्ना यांच्यासोबतचा विवाह ‘कायदेशीर’ मानण्यास नकार दिला आहे. या निकालामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कायदेशीर लढाई लढणाऱ्या डिंपल कपाडिया, ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अनिता अडवाणी यांनी असा दावा केला होता की, त्यांनी आणि राजेश खन्ना यांनी त्यांच्या ‘आशीर्वाद’ बंगल्यातील मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने विवाह केला होता. राजेश खन्ना यांनी त्यांच्या भांगेत कुंकू भरून आणि गळ्यात मंगळसूत्र घालून त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले होते, असा त्यांचा युक्तिवाद होता. मात्र, चित्रपटसृष्टीतील दबावामुळे हे लग्न कधीही जाहीर करण्यात आले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. इतकेच नव्हे, तर त्यांनी राजेश खन्ना यांच्या कुटुंबीयांवर कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर आरोपही केले होते, जे २०१५ मध्येच न्यायालयाने फेटाळून लावले होते.

न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर स्पष्ट केले की, अनिता अडवाणी यांचे अपील तांत्रिक आणि कायदेशीर निकषांवर टिकणारे नाही. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचा कधीही औपचारिक घटस्फोट झाला नसल्याने, कायद्याच्या दृष्टीने डिंपल कपाडिया याच त्यांच्या पत्नी ठरतात. अनिता यांनी शेवटच्या दिवसांत राजेश खन्ना यांची सेवा केल्याचा आणि त्यांच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहिल्याचा दावा केला असला तरी, त्याला विवाहाचा कायदेशीर दर्जा देता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

हा वाद २०१२ मध्ये राजेश खन्ना यांच्या निधनानंतर खऱ्या अर्थाने पेटला. अनिता यांनी असा आरोप केला होता की, त्या १० ते १२ वर्षे राजेश खन्ना यांच्यासोबत राहिल्या, मात्र त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी त्यांना घरातून बाहेर काढले आणि अंत्यविधीतही सहभागी होऊ दिले नाही. दुसरीकडे, कपाडिया कुटुंबाने हे सर्व दावे सुरुवातीपासूनच फेटाळून लावले होते. आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनिता अडवाणी यांच्या दाव्यातील कायदेशीर हवा निघून गेली असून, राजेश खन्ना यांच्या वारसा हक्काचा वाद आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ