ओतूर,प्रतिनिधी : रमेश तांबे
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात एका वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेले दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि चाकू जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे तन्मय दिलीप थोरात (वय २०) आणि इमरान हसन मंडल (वय २०) अशी असून दोघेही नारायणगाव येथील रहिवासी आहेत.
ही घटना ९ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली होती. नभोराबाई कोंडीबा जाधव (वय ७७, रा. वारूळवाडी, ता. जुन्नर) या आपल्या जनावरांसह घरी जात असताना दोन अज्ञात इसम मोटरसायकलवर आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि ते गोपनीय सूत्रांना दाखवण्यात आले. त्यातून आरोपींची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिस तपासात असेही समोर आले की, या दोन्ही आरोपींवर यापूर्वी चोरी, घरफोडी, जबरी चोरी आणि मारामारीचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
चोरट्यांकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, चाकू जप्त करण्यात आले. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर,सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शेलार,सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रविण सपांगे, पोलीस सब इन्स्पेक्टर जगदेव पाटील,पोलिस अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, राजू मोमिन, नारायणगाव पोस्टे चे मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, टीलेश जाधव, गोविंद केंद्रे यांनी केली आहे.




