अराकमधील ‘हेवी वॉटर रिएक्टर’ लक्ष्यावर; इराणचा अमेरिकन कंपन्यांना इशारा, ‘आगीशी खेळू नका’ म्हणत दिली धमकी
मध्य-पूर्वेतील युद्ध आता अत्यंत विनाशकारी वळणावर पोहोचले असून इस्रायलने थेट इराणच्या अणू प्रकल्पांना (Nuclear Plants) लक्ष्य केले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकीकडे इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे सांगत असतानाच, दुसरीकडे इस्रायली सैन्याने इराणमधील अराक येथील ‘हेवी वॉटर रिएक्टर’ आणि यझ्त प्रांतातील ‘येलोकेक प्रोडक्शन प्लांट’वर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. विशेष म्हणजे, इस्रायलने या हल्ल्याची अधिकृत जबाबदारी स्वीकारली आहे. इराणच्या अणू ऊर्जा संघटनेने या वृत्ताला दुजोरा दिला असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा किरणोत्सर्गाचा धोका निर्माण झालेला नाही, असे स्पष्ट केले आहे.
या हल्ल्यानंतर इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कोर’ने (IRGC) इस्रायलला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. IRGC चे कमांडर सय्यद माजिद मूसावी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यस्थळ सोडण्याचे आदेश दिले आहेत. “तुम्ही आगीशी खेळत आहात, यावेळी उत्तर केवळ शब्दांत नसेल,” अशी तंबी मूसावी यांनी दिली आहे. दरम्यान, इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्ज यांनी इराणला या ‘युद्ध गुन्ह्या’साठी मोठी किंमत मोजावी लागेल, असे सांगत हल्ले अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.




