बिग बॉस OTT मधून प्रसिद्धी मिळवलेला यूट्यूबर अरमान मलिक सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन झालं असून, त्याची पहिली पत्नी पायल मलिक हिने चौथ्या बाळाला जन्म दिला आहे. या आनंदाची बातमी अरमानने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांशी शेअर केली आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये पायल हॉस्पिटलच्या बेडवर विश्रांती घेताना दिसत आहे, तर अरमान आपल्या नवजात बाळाला हातात घेत आनंद व्यक्त करताना दिसतो. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसून येतो. मात्र, अद्याप बाळाचा चेहरा किंवा मुलगा की मुलगी याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
पोस्टसोबत अरमानने “जच्चा-बच्चा दोघेही ठणठणीत आहेत” असा संदेश दिला आहे. ही पोस्ट शेअर होताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. काहींनी धार्मिक संदर्भ देत ही आनंदाची वेळ खास असल्याचेही म्हटले आहे, तर काहींनी बाळाच्या लिंगाबाबत अंदाज व्यक्त केले आहेत.
याआधी अरमानने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात डिलिव्हरीपूर्व तयारी आणि कुटुंबातील उत्सुकता दिसून येत होती. या व्हिडिओत त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिकही दिसत असून संपूर्ण कुटुंब आनंदात असल्याचे जाणवते.
सध्या अरमान मलिकच्या या पोस्ट्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्याच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत.




