पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ईशानकडे नेतृत्व; सराव सामन्यात झीशान अन्सारीसोबत झाली शाब्दिक चकमक
आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीपूर्वी सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्याने, व्यवस्थापनाने स्फोटक फलंदाज ईशान किशनकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. दरम्यान, हैदराबादच्या सराव शिबिरात एक नाट्यमय प्रसंग घडला. एका सराव सामन्यात ईशानने युवा लेगस्पिनर झीशान अन्सारीच्या एकाच षटकात २० धावा कुटल्या, मात्र पुढच्याच चेंडूवर झीशानने ईशानला बाद करत जोरदार प्रत्युत्तर दिले. विकेट घेतल्याच्या उत्साहात झीशानने ईशानला मैदानाबाहेर जाण्याचा इशारा केला, ज्यामुळे दोघांमध्ये काही काळ शाब्दिक चकमक उडाली. मात्र, काही क्षणातच ईशान हसत पॅव्हेलियनमध्ये परतल्याने हा केवळ खेळातील ‘जोश’ असल्याचे स्पष्ट झाले.
नव्या दमासह आरसीबीशी भिडणार हैदराबाद:
२०२५ चा हंगाम सनरायझर्ससाठी निराशाजनक राहिला होता. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांसारख्या खेळाडूंना सातत्य राखता आले नव्हते, केवळ हेनरिक क्लासेनने एकहाती झुंज दिली होती. आता २८ मार्च रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यात हैदराबादचा संघ नव्या रणनीतीसह उतरणार आहे. हर्षल पटेल, लियाम लिव्हिंगस्टोन आणि शिवम मावी यांसारख्या नव्या दमाच्या खेळाडूंमुळे संघाची ताकद वाढली असून, ईशान किशनच्या नेतृत्वाखाली ‘ऑरेंज आर्मी’ विजयी सलामी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




