सुरक्षेच्या कारणास्तव मैदानाचे स्वरूप बदलले; दोन सामने रायपूरमध्ये, पुणे-मुंबईचा पत्ता कट!
गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आगामी आयपीएल हंगामातील आरसीबीचे घरचे सामने बंगळुरूच्या ऐतिहासिक एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि आरसीबी व्यवस्थापन यांच्यातील सविस्तर चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, बीसीसीआयलाही यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २८ मार्च रोजी होणारा स्पर्धेचा सलामीचा सामना याच मैदानात खेळवला जाण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या वर्षी १८ वर्षांनंतर जेतेपद पटकावल्यानंतर बंगळुरूमध्ये काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीत ११ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर चिन्नास्वामी स्टेडियमच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. उच्चस्तरीय चौकशीनंतर स्टेडियम परिसरातील गर्दीच्या नियोजनासाठी मोठे बदल सुचवण्यात आले आहेत. त्यानुसार आता प्रवेशद्वारांचा विस्तार करण्यात येत असून, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेला विनाअडथळा ये-जा करता यावी यासाठी विशेष ‘ग्रीन कॉरिडॉर’ आणि आधुनिक उपाययोजना राबवल्या जात आहेत.
या सर्व गोंधळात आरसीबीने आपले सामने पुणे किंवा मुंबईत हलवण्याचा विचार केला होता, मात्र तिथल्या प्रशासनाकडून संमती न मिळाल्याने संघ पुन्हा आपल्या जुन्याच बालेकिल्ल्यात परतला आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामातील आरसीबीचे दोन सामने रायपूरच्या शहीद वीर नारायण स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. छत्तीसगड सरकारने या आयोजनासाठी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे. जेतेपदाचा मान राखण्यासाठी सज्ज असलेल्या आरसीबीला आपल्या घरच्या मैदानावर प्रेक्षकांचा अलोट पाठिंबा मिळणार, हे आता निश्चित झाले आहे.




