*ममता बॅनर्जींचा पराभव करून मिळवलं सत्तेचं सिंहासन; ब्रिगेड परेड ग्राऊंडवर रंगला ऐतिहासिक सोहळा
पश्चिम बंगालच्या राजकारणात आज एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत राज्याची धुरा आपल्या हाती घेतली. कलकत्त्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राऊंडवर हा सोहळा पार पडला. या निवडणुकीत सुवेंदू यांनी भवानीपूर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करून एक मोठा चमत्कार घडवला. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एनडीए शासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्री उपस्थित होते. सुवेंदू यांनी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले, तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुवेंदू अधिकारी यांना दिलेली खास भेट. सुवेंदू शुभेच्छा स्वीकारण्यासाठी योगींच्या जवळ गेले असता, योगी आदित्यनाथ यांनी आपल्या गळ्यातील ‘भगवा गमछा’ काढून तो सुवेंदू यांच्या गळ्यात घातला. या कृतीतून हिंदुत्वाचा एक प्रखर संदेश देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. योगींनी दिलेला हा गमछा म्हणजे सुवेंदू यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेला दिलेली पावती आणि उत्तर प्रदेशप्रमाणेच बंगालमध्येही आक्रमक राजकारण करण्याचा संकेत मानला जात आहे.
सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले सुवेंदू २०२० मध्ये भाजपमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजपसाठी रस्त्यावरची लढाई लढली. २०२१ मध्ये नंदीग्राममध्ये ममतांचा पराभव केल्यानंतर, आता भवानीपूरमध्येही त्यांनी हा करिश्मा कायम राखला. बंगालमध्ये आता उत्तर प्रदेशप्रमाणेच गुन्हेगारांविरुद्ध ‘बुलडोझर’ कारवाईची प्रथा सुरू होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. सुवेंदू यांच्या रूपाने बंगालला एक असा मुख्यमंत्री मिळाला आहे, ज्याचा जनसंपर्क दांडगा असून जो हिंदुत्वाच्या वारसा पुढे नेण्यासाठी सज्ज आहे.




