Pune crime : प्रेमप्रकरणातून २२ वर्षीय तरुणीचा ब्लेडने गळा चिरला; रक्ताच्या थारोळ्यातून भावाला केला व्हिडिओ कॉल

spot_img

चंदननगरमधील धक्कादायक घटना; मृत्यूशी झुंज देणाऱ्या पीडितेने कागदावर नाव लिहून आरोपीला केलं उघड!
पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून, चंदननगर भागातील पठारेवस्ती परिसरात एका २२ वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून झालेल्या वादाचे पर्यावसान रक्तरंजित खेळात झाले असून, प्रियकरानेच आपल्या प्रेयसीचा ब्लेडने गळा चिरून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सध्या ही तरुणी अतिदक्षता विभागात (ICU) मृत्यूशी झुंज देत असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. याप्रकरणी चंदन नगर पोलिसांनी तातडीने सूत्रं हलवत आरोपी दिलीप राठोड याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी दिलीप एकाच मॉलमध्ये कामाला होते आणि तिथूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात खटके उडत होते. घटनेच्या दिवशी तरुणी घरात एकटीच असताना दिलीप तिथे पोहोचला. वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि रागाच्या भरात दिलीप सोफ्यावर पडलेल्या ब्लेडने तरुणीच्या गळ्यावर वार केले. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीने हिंमत न हारता आपल्या भावाला फोन केला, पण गळा चिरला गेल्यामुळे तिला बोलता येत नव्हते. तिने भावाला व्हिडिओ कॉल करून आपली अवस्था दाखवली, जे पाहून भावाच्या पायाखालची जमीनच सरकली.

तरुणीचा भाऊ भगतसिंग दोहरे याने तातडीने घरी धाव घेऊन शेजाऱ्यांच्या मदतीने तिला ससून रुग्णालयात दाखल केले. प्रकृती खालावल्याने तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलीस जेव्हा रुग्णालयात पोहोचले, तेव्हा पीडित तरुणी बोलण्याच्या स्थितीत नव्हती. मात्र, तिने खुणावून पेन आणि कागद मागितला आणि त्यावर ‘दिलीप राठोड’ असे नाव लिहून आपला मारेकरी कोण आहे हे पोलिसांना सांगितले. या धाडसी पुराव्यामुळे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यात एकामागून एक घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ