US UFO Files : अमेरिकेने सीक्रेट फाईल्स केल्या सार्वजनिक; अपोलो मिशनपासून UFO पर्यंत मोठे खुलासे!

spot_img

ब्रह्मांडात आपण एकटेच आहोत का? की पृथ्वीबाहेर दुसरी एखादी प्रगत संस्कृती अस्तित्वात आहे? एलियन आणि उडत्या तबकड्या (UFO) या विषयावर गेल्या अनेक दशकांपासून जगभरात वाद आणि कुतूहल आहे. बर्म्युडा ट्रँगलपासून ते एरिया-५१ पर्यंत अनेक रहस्यमय कथा आपण ऐकल्या आहेत. मात्र, आता अमेरिकन सरकारने या रहस्यावरचा पडदा अधिकृतपणे उचलला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विशेष आदेशानंतर, अमेरिकेने ‘युएफओ’ (UFO) आणि एलियन्सशी संबंधित अत्यंत गोपनीय फाईल्स सार्वजनिक केल्या आहेत. या फाईल्समध्ये असे काही दावे आहेत, जे विज्ञानाच्या जगाला हादरवून सोडणारे आहेत.

शुक्रवारी सार्वजनिक करण्यात आलेल्या या दस्तावेजांमध्ये केवळ अफवा नाहीत, तर अमेरिकन सैन्याचे गोपनीय मेमो, अपोलो मिशनमधील रेकॉर्ड्स आणि अशा अनेक शास्त्रज्ञांची अधिकृत वक्तव्ये आहेत ज्यांनी प्रत्यक्ष UFO पाहिल्याचा दावा केला आहे. या फाईल्समध्ये १९५७ पासून ते २०२३ पर्यंतच्या घटनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे दावे कोणत्याही सामान्य व्यक्तीने केलेले नसून, त्यामध्ये बडे लष्करी अधिकारी आणि नामांकित शास्त्रज्ञांचा समावेश आहे. या अहवालांनुसार, पृथ्वीबाहेर एक अत्यंत प्रगत संस्कृती अस्तित्वात असल्याचे संकेत मिळत आहेत.

या फाईल्समध्ये १९५७ मधील एफबीआयचा एक अत्यंत महत्त्वाचा अहवाल आहे. त्याकाळी अधिकाऱ्यांनी आकाशात एक विशाल आणि चमकती गोलाकार चकती वेगाने जाताना पाहिली होती. इतकेच नाही तर, २०२३ मध्ये काही अमेरिकन नागरिकांनी आकाशात एक स्थिर, फिरणारी धातूची चकती पाहिल्याचा दावा केला आहे. ही वस्तू कोणत्याही विमानासारखी दिसत नव्हती आणि ती बराच वेळ आकाशात एकाच जागी स्थिर होती. याव्यतिरिक्त, २०२२ मध्ये इराक, सीरिया आणि युएई सारख्या मध्य-पूर्व देशांच्या आकाशातही अशाच प्रकारच्या चकाकणाऱ्या वस्तू दिसल्या होत्या. अमेरिकन लष्कराने या वस्तूंना ‘अनआयडेंटिफाईड एनोमलस फिनॉमिना’ (UAP) या श्रेणीत टाकले असून, त्यासंबंधीचे व्हिडिओही आता समोर आले आहेत.

या गुप्त दस्तावेजांमधील सर्वात मोठा खुलासा म्हणजे ‘अपोलो मिशन’ दरम्यान अंतराळवीरांना आलेले अनुभव. अपोलो ११, १२ आणि १७ या मोहिमांमध्ये गेलेल्या अंतराळवीरांनी जे पाहिले, ते गेल्या अनेक वर्षांपासून गोपनीय ठेवण्यात आले होते. १९६९ च्या चंद्र मोहिमेदरम्यान प्रसिद्ध अंतराळवीर बज एल्ड्रिन यांनी एक चमकदार वस्तू त्यांच्या यानाचा पाठलाग करत असल्याचे पाहिले होते. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा त्यांनी बारकाईने निरीक्षण केले, तेव्हा ती वस्तू मानवनिर्मित किंवा अंतराळातील कचरा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे अनुभव आता अधिकृतपणे जगासमोर आले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या फाईल्स सार्वजनिक करताना स्पष्ट केले की, सामान्य जनतेला एलियन आणि युएफओ विषयाचे सत्य जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. कित्येक वर्षांपासून जे सत्य दाबून ठेवले गेले होते, ते आता जगासमोर आणले जात आहे. काही तज्ज्ञ याला भविष्यातील धोक्याची सूचना मानत आहेत, तर काही याला विज्ञानातील एक मोठी प्रगती मानत आहेत. एक गोष्ट मात्र नक्की, या फाईल्स सार्वजनिक झाल्यामुळे आता मानवाचा विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ