इराण-अमेरिका तणावानंतर किम जोंग यांचा मोठा निर्णय; संविधानात बदल करून अण्वस्त्रांची सूत्रे लष्कराकडे सुपूर्द
जागतिक स्तरावर इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता थेट उत्तर कोरियात उमटले आहेत. इराणच्या सर्वोच्च नेत्यांना ज्या पद्धतीने लक्ष्य करण्यात आले, त्यातून धडा घेत उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग-उन यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी संविधानात एक अत्यंत भयानक आणि विनाशकारी बदल केला आहे. नव्या घटनादुरुस्तीनुसार, जर किम जोंग-उन यांची हत्या झाली किंवा त्यांना सत्तेपासून दूर करण्याचा परकीय प्रयत्न झाला, तर उत्तर कोरियाचे अण्वस्त्र सैन्य कोणत्याही आदेशाची वाट न पाहता शत्रूराष्ट्रावर ‘तात्काळ’ अणुहल्ला करेल.
प्योंगयांग येथे पार पडलेल्या १५ व्या सुप्रीम पीपल्स असेंब्लीच्या अधिवेशनात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या कायद्यामुळे आता उत्तर कोरियाची अण्वस्त्रे केवळ किम जोंग यांच्या आदेशावर अवलंबून नसतील. जर सर्वोच्च नेतृत्व (किम जोंग-उन) काम करण्यास असमर्थ ठरले किंवा त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला, तर अण्वस्त्र डागण्याची प्रक्रिया आपोआप (Automatic) सुरू होईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. अणुनीती कायद्यातील सुधारित ‘कलम ३’ मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, देशाच्या कमांड आणि नियंत्रण यंत्रणेला धोका पोहोचल्यास प्रत्युत्तरादाखल अण्वस्त्रांचा वापर हा अंतिम पर्याय असेल.
उत्तर कोरियाने हा निर्णय प्रामुख्याने अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या वाढत्या दबावामुळे घेतला आहे. किम जोंग-उन यांना ‘आक्रमक शासक’ म्हणून ओळखले जाते, परंतु या नव्या कायद्यामुळे आता अणुयुद्धाचा धोका पूर्वीपेक्षा कित्येक पटीने वाढला आहे. उत्तर कोरिया सातत्याने आपल्या क्षेपणास्त्र प्रणालीचे आधुनिकीकरण करत आहे, त्यातच आता हा ‘डेथ हँड’ (Death Hand) सारखा कायदा आल्यामुळे जागतिक महासत्तांची झोप उडाली आहे. हा बदल म्हणजे शत्रूराष्ट्रांना दिलेला एक सरळ इशारा आहे की, किम जोंग यांच्या केसालाही धक्का लागल्यास त्याचा परिणाम संपूर्ण जगाचा विनाश होऊ शकतो.




