नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर उभे राहिलेले बंडखोरीचे आव्हान शमवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांसह भाजपच्या गणेश गीते यांनी आपले अर्ज मागे घेतले असले, तरी गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे हे दोन नेते अजूनही निवडणुकीच्या रिंगणात ठाम आहेत. महायुतीने ही जागा शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) नरेंद्र दराडे यांच्यासाठी सोडली असल्याने, या दोन्ही नेत्यांच्या बंडखोरीमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत आणि भाजपकडून गिरीश महाजन हे नाशिकमध्ये ठाण मांडून असून बंडखोरांची मनधरणी करत आहेत. आता अर्ज मागे घेण्याची अधिकृत मुदत संपली असल्यामुळे, या दोन्ही नेत्यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना ‘बिनशर्त पाठिंबा’ द्यावा, यासाठी नेत्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.
या संपूर्ण राजकीय पेचावर बोलताना मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, कोणावरही उमेदवारी मागे घेण्यासाठी कोणताही राजकीय दबाव आणला जात नाहीये. बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांच्या ‘मी भाजपमध्ये नाही आणि माघार घेणार नाही’ या भूमिकेचा आदर करत सामंत म्हणाले, “आम्ही त्यांना केवळ महायुतीचा धर्म म्हणून सन्मानपूर्वक विनंती केली आहे, कोणताही दबाव टाकलेला नाही.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या उमेदवारासमोर अडचण निर्माण होऊ नये, हीच यामागील प्रामाणिक भूमिका आहे. राजकारणात तात्कालिक समज-गैरसमज होत असतात, ते वेळेवर दूर केले तर त्याचे विपरीत परिणाम होत नाहीत. तसेच, गीते बंधूंनी ‘आम्ही फक्त गिरीश महाजन यांचे ऐकतो’ असे म्हटल्याचा संदर्भ देत सामंत यांनी स्पष्ट केले की, महायुतीमधील कोणत्याच नेत्याचे खच्चीकरण करण्याचा कोणाचाही हेतू नसून, महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने कसा निवडून येईल, यासाठी आम्ही दोघे मंत्री मिळून सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या मंत्री दादा भुसे आणि गिरीश महाजन हे थेट उमेदवारांच्या गाठीभेटी घेत असून, आगामी काळात महायुतीला पोषक असा सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.




