Pune News : ओतूरला वारकरी साहित्य परिषदेचा मेळावा संपन्न; नवीन पदाधिकाऱ्यांची निवड

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:रमेश तांबे

जुन्नर तालुका वारकरी साहित्य परिषदेचा वार्षिक मेळावा मंगळवार, ३ जून रोजी ओतूर (ता. जुन्नर) येथे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. परिषदेचे तालुकाध्यक्ष ह.भ.प. गंगाराम महाराज डुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. भाऊसाहेब महाराज हांडे यांच्यासह अनेक मान्यवर, वारकरी, कीर्तनकार आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वारकरी संप्रदायाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्याचा आढावा घेत भविष्यातील उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.

मेळाव्यात बोलताना भाऊसाहेब महाराज हांडे यांनी पुणे जिल्ह्यातील वारकरी साहित्य परिषदेच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. जुन्नर तालुका परिषद विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यात अग्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात गंगाराम महाराज डुंबरे यांनी ११ नोव्हेंबर २०११ रोजी स्थापन झालेल्या परिषदेच्या प्रवासाची माहिती देत वारकऱ्यांच्या समस्या सोडविणे, मानधन मिळवून देणे, भागवत धर्माचा प्रचार-प्रसार, शालेय स्तरावर प्रवचनांचे आयोजन तसेच गावोगावी स्वच्छता अभियान राबविणे अशा विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यांची माहिती दिली.

सरकारी स्तरावर वारकऱ्यांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी परिषद सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वारकऱ्यांना मानधन मिळवून देण्यात परिषदेने महत्त्वाची भूमिका बजावली असून भविष्यातही गरजू वारकऱ्यांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रकाश महाराज नवले आणि मंगलताई तांबे यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. तसेच रत्नाताई विठ्ठल महाकाळ यांची जुन्नर तालुका संघटकपदी निवड जाहीर करण्यात आली.

या प्रसंगी भरत तांबे, धोंडीभाऊ महाराज पानसरे, अनंतराव गटकळ, प्रकाश नवले, तानाजी खराडे आणि तुकाराम महाराज ढोमसे यांसह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल शितोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रत्ना महाकाळ यांनी केले. मेळाव्याने वारकरी समाजात नवचैतन्य निर्माण करत संघटन अधिक मजबूत करण्याचा संदेश दिला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ