NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असून, संसदेतही या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. काँग्रेससह विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संसदेत थेट चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी विरोधकांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. लोकशाही व्यवस्थेत महत्त्वाचे निर्णय रस्त्यावरच्या आंदोलनातून नव्हे, तर संसदेत चर्चा करून घेतले जातात, असे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी ‘पळपुटेपणा’ सोडून संसदेत चर्चेला सामोरे जावे, असा टोला त्यांनी लगावला.
देशाच्या संविधानावर विश्वास असेल, तर विरोधकांनी संसदेत प्रश्न उपस्थित करावेत. सरकारकडून उत्तर हवे असल्यास ते संसदेत मागावे. तसेच एखादी ठोस संकल्पना किंवा उपाययोजना असेल, तर चर्चेच्या माध्यमातून सरकारवर ती स्वीकारण्याचा दबाव आणता येतो, असे फडणवीस यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न थांबवावा, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतील, तर ते चर्चा आणि संसदीय प्रक्रियेतूनच घेतले जावेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते आणि NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर संसदेत पुढील काळात कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




