महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने संयुक्त मोहीम राबवत मिरा-भाईंदर परिसरातून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या तपास आणि चौकशीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, अटक करण्यात आलेला हुजैफा हा तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हुजैफाचे संबंध कथितरित्या सैयद मुदस्सिर हुसेन उर्फ मुन्ना झिंगाडा याच्याशी असल्याचा संशय आहे. मुन्ना झिंगाडाचे नाव अंडरवर्ल्डशी संबंधित असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगितले जात असून, काही संशयित कारवायांमध्ये त्याची भूमिका असल्याचा तपास सुरू आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे परिसरातील रेल्वे जागेवरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईनंतर निर्माण झालेल्या वातावरणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय आहे. काही तरुणांना भडकावून त्यांना बेकायदेशीर कारवायांकडे वळवण्याचा कट रचला जात असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली आहे. या कथित नेटवर्कचे धागेदोरे परदेशाशी जोडले गेले असल्याची शक्यता तपासली जात आहे.
हुजैफावर मुंबई परिसरात स्थानिक संपर्क जाळे उभारणे आणि आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. चौकशीदरम्यान त्याला या नेटवर्कमार्फत काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहितीही समोर आली आहे. सोशल मीडियाचा वापर करून काही युवकांशी संपर्क साधला जात होता आणि आर्थिक मोबदल्याचे आमिष दाखवले जात असल्याचाही तपास सुरू आहे.
या प्रकरणात यापूर्वी तौकीर आणि साजिद शेख या दोघांना अनुक्रमे कुर्ला आणि मुंब्रा परिसरातून अटक करण्यात आली होती. या दोघांच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे सांगितले जात आहे. तपास यंत्रणांच्या मते, जलद आर्थिक लाभाच्या अपेक्षेत काही युवक या जाळ्यात अडकले असावेत.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या हुजैफाला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी त्याच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संपर्क जाळे आणि कथित दहशतवादी संबंधांचा सखोल तपास सध्या सुरू असून, आगामी काळात आणखी महत्त्वाच्या माहितीचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




