तामिळनाडूतील वलपराई घाट परिसरात गंभीर रस्ते अपघात घडला असून यात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. केरळमधील पेरिंथलमन्ना येथून आलेले 13 पर्यटक टेम्पो ट्रॅव्हलरमधून प्रवास करत होते. घाटातील धोकादायक हेअरपिन वळणावर वाहनाचा ताबा सुटल्याने ते घसरत दरीत कोसळले.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात 13 व्या हेअरपिन वळणाजवळ झाला आणि वाहन घसरत 9 व्या वळणापर्यंत खाली गेले. या दुर्घटनेत एक पुरुष आणि आठ महिलांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने बाहेर काढून पोल्लाची येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हेअरपिन वळण म्हणजे डोंगराळ भागात उंची चढण्यासाठी बनवलेले तीव्र वळण असलेले रस्ते. अशा रस्त्यांवर वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी लागते. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांविषयी संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त करून जखमींना उत्तम उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.




