“बाबासाहेबांनी राजीनामा दिला, तुमची तयारी आहे का?” पुराव्यानिशी अंधारेंनी सत्ताधाऱ्यांना घेरले
महिला आरक्षण विधेयकावरून सुरू असलेल्या राजकीय युद्धात आता शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘रेटून खोटे’ बोलत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संसदेत विधेयक नामंजूर झाल्याचा ठपका विरोधकांवर ठेवणाऱ्या भाजपला आरसा दाखवताना अंधारे यांनी १९५१ चा इतिहास उकरून काढला. “महिलांच्या हक्कांच्या विधेयकाची खरी भ्रूणहत्या तर तेव्हाच झाली होती, जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या बिलाला शामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी कडाडून विरोध केला होता,” असे सांगत अंधारे यांनी भाजपच्या विचारधारेवरच निशाणा साधला. महिलांना न्याय देता येत नाही म्हणून बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, तशी हिंमत फडणवीस दाखवणार का? असा बोचरा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
अंधारे यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचे २०२३ मधील जुने ट्विट्स वाचून दाखवत सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पीपणावर बोट ठेवले. “जर २०२३ मध्येच अमित शहा आणि फडणवीसांनी हे विधेयक मंजूर झाल्याचे ट्विट करून जल्लोष केला होता, तर मग आज ते ‘विधेयकाची हत्या झाली’ असे कसे म्हणू शकतात?” असा सवाल करत त्यांनी सत्तेतील नेत्यांच्या विधानांमधील विसंगती समोर आणली. इतकेच नव्हे तर, फडणवीसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर महात्मा फुलेंची ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा आसूड’ ही पुस्तके वाचून दाखवावीत आणि त्यावर मोहन भागवतांची प्रतिक्रिया घ्यावी, असे खुले आव्हानही त्यांनी दिले. या आक्रमक पवित्र्यामुळे महिला आरक्षणाचा मुद्दा आता ‘ऐतिहासिक दावे विरुद्ध सद्यस्थिती’ असा रंगला आहे.




