संकटकाळात देवदूतासारखा धावून आलेला आणि पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या छातीवर दहशतवाद्यांच्या गोळ्या झेलणारा ‘पोनी चालक’ शहीद आदिल सय्यद शहा यांच्या शौर्याला महाराष्ट्राने मानाचा मुजरा केला आहे. गेल्या वर्षी बैसरन व्हॅलीत झालेल्या हल्ल्यात पर्यटकांची ढाल बनणाऱ्या आदिल यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब उघड्यावर आले होते. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे आज या कुटुंबाच्या डोक्यावर हक्काचे आणि पक्के छप्पर उभे राहिले आहे. माती आणि लाकडाच्या मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्या शहा कुटुंबासाठी शिवसेनेने सुमारे १२ लाख रुपये खर्चून अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त असे सिमेंट-काँक्रीटचे घर उभारले असून, आज या घराचा ताबा कुटुंबीयांना देण्यात येणार आहे.
या घराच्या निमित्ताने काश्मीर ते महाराष्ट्र असे माणुसकीचे एक वेगळे नाते विणले गेले आहे. आदिल यांचे वडील इक्बाल शहा यांनी अत्यंत भावूक होत, “माझ्या मुलाने देशासाठी बलिदान दिले याचा सार्थ अभिमान आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. तसेच पर्यटकांना पुन्हा एकदा काश्मीरमध्ये येण्याचे आवाहन करताना “आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असा विश्वासही त्यांनी दिला. युवा सेनेचे बाजीराव चव्हाण यांच्या अथक परिश्रमातून पूर्ण झालेल्या या वास्तूचा लोकार्पण सोहळा गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, “ज्या आदिलने पर्यटकांना घरच्या सुरक्षिततेची जाणीव करून दिली, त्याच्या कुटुंबाला पक्के घर देणे हे आमचे कर्तव्य होते,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




