Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या उपचारांवरून वाद; पत्नी थेट दिल्ली उच्च न्यायालयात!

spot_img

“सफदरजंग रुग्णालयावर विश्वास नाही, रिपोर्टमध्ये तफावत…” गीतांजली आंग्मो यांचे गंभीर आरोप

दिल्लीतील जंतरमंतर येथे गेल्या २१ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने अधिकृत मेडिकल बुलेटिन जारी करत वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले असले, तरी या संपूर्ण प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल करत रुग्णालयाच्या भूमिकेवर आणि उपचारांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत गीतांजली यांनी सफदरजंग रुग्णालयावर तीव्र अविश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी असा आरोप केला आहे की, सोनम वांगचुक यांना उपचाराच्या नावाखाली बेकायदेशीरपणे आणि सक्तीने ताब्यात घेण्यात आले आहे. जंतरमंतरवरून रुग्णालयात आणल्यानंतर, गेल्या २० दिवसांपासून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून असलेले वैयक्तिक डॉक्टर आणि त्यांचे वकील यांना वांगचुक यांच्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले. ही स्थानबद्धता पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असून ती भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १९ (अभिव्यक्ती स्वातंत्र्य) आणि अनुच्छेद २१ (वैयक्तिक स्वातंत्र्य आणि जगण्याचा अधिकार) चे थेट उल्लंघन असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. वांगचुक यांना त्यांच्या कुटुंबियांच्या पसंतीच्या दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी, अशी मुख्य मागणी त्यांनी कोर्टाकडे केली आहे.

माध्यमांशी बोलताना गीतांजली आंग्मो यांनी रुग्णालयाच्या मेडिकल रिपोर्टमधील एका मोठ्या तफावतीचा पर्दाफाश केला. रुग्णालयाने कुटुंबियांना सांगितले होते की वांगचुक यांच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी २.९ पर्यंत घसरली आहे, जी वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत धोकादायक मानली जाते. मात्र, रुग्णालयाने जारी केलेल्या अधिकृत हेल्थ बुलेटिनमध्ये या आकड्याचा कोणताही उल्लेख केला नाही. या संशयास्पद प्रकारानंतर कुटुंबियांनी रात्री उशिरा एका स्वतंत्र खासगी लॅबमधून वांगचुक यांच्या रक्ताची तपासणी केली, ज्यामध्ये पोटॅशियमची पातळी ३.५ आली. हा स्तर वैद्यकीयदृष्ट्या अगदी सामान्य मानला जातो. या लॅब रिपोर्टच्या आधारे गीतांजली यांनी सरकारी रुग्णालयाच्या हेतूवर शंका उपस्थित केली असून, पतीच्या सुरक्षिततेसाठी त्यांना तात्काळ इतरत्र हलवण्याची आग्रही मागणी केली आहे. या न्यायालयीन लढ्यामुळे आता वांगचुक यांच्या आंदोलनाला एक नवी दिशा मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ