रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीसाठी मुदतवाढ देण्यावरून राऊत आक्रमक; “मराठीसाठी सरकार मागे हटत असेल, तर मंत्र्यांनी खुर्ची सोडावी!”
महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी १ मे पासून मुदतवाढ देण्याचे संकेत दिल्यानंतर, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. “महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच असेल,” अशी गर्जना करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या त्या घोषणेचे ‘म्यांव’ का झाले? असा बोचरा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. सरकार कोणाचेही असो, पण मराठीच्या मुद्द्यावर तडजोड करणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्यासारखे आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
संजय राऊत यांनी परप्रांतीय रिक्षाचालकांना खडे बोल सुनावताना म्हटले की, “तुम्ही या शहरात रोजीरोटी कमवण्यासाठी येता. रिक्षात बसणारा बहुतांश प्रवासी हा मराठी असतो, त्यामुळे संवाद साधताना गैरसमज होऊन वाद किंवा मारामाऱ्या टाळण्यासाठी तुम्हाला मराठी येणे तुमच्याच सोयीचे आहे. पण या मुद्द्यावर सरकारला आव्हान देणारी भाषा करणे म्हणजे थेट महाराष्ट्राला आव्हान देण्यासारखे आहे.” राऊत यांनी सरकारला सल्ला दिला की, १ मे पासूनच कडक नियम बनवा आणि ज्यांना मराठी येत नाही त्यांना सहा महिन्यांची मुदत द्या, पण सक्ती मागे घेऊ नका. मराठी ही अत्यंत सोपी, सरळ आणि रसाळ भाषा आहे, ती शिकणे कठीण नाही, असेही त्यांनी नमूद केले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, राऊत यांनी या विषयावरून थेट मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “मराठीच्या प्रश्नावर जर सरकार एक पाऊल मागे हटत असेल, तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला त्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे. जर हे मंत्री खरोखर स्वाभिमानी आणि मराठी प्रेमी असतील, तर त्यांनी सी.डी. देशमुखांप्रमाणे पदाचा त्याग करून मराठीसाठी लढायला हवे,” असे आव्हान त्यांनी दिले. दरम्यान, मंगलप्रभात लोढा यांच्यावरही राऊत यांनी निशाना साधला. केईएम रुग्णालय काही लोढांनी बांधले नाही, ते केवळ आरएसएसचा अजेंडा पुढे रेटत असल्याचा गंभीर आरोप करत राऊत यांनी सरकारला धारेवर धरले आहे.




