देशाचे सरन्यायाधीश यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ या नव्या डिजिटल चळवळीची जोरदार चर्चा रंगली आहे. अल्पावधीतच या मोहिमेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याने ती राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे. या घडामोडींनंतर केंद्र सरकारनेही डिजिटल माध्यमांवर काही तातडीच्या हालचाली केल्याची माहिती समोर येत आहे.
या चळवळीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ६ जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाचे आयोजन केले आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहारांविरोधात हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. देशभरातील विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकारात्मक भूमिका मांडली. राष्ट्रहितासाठी आणि व्यवस्था सुधारण्यासाठी नागरिक एकत्र येत असतील, तर अशा चळवळींना शुभेच्छा दिल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले. या आंदोलनाला वैयक्तिक पाठिंबा देणार का, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर भूमिका स्पष्ट केली जाईल, असे सांगितले.
यावेळी त्यांनी २०१४ पूर्वी झालेल्या जनआंदोलनांचा संदर्भ देत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनाही आवाहन केले. दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या पाठीशी उभे राहत त्यांना मार्गदर्शन आणि आशीर्वाद द्यावेत, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली. त्यामुळे या आंदोलनाला पुढील काही दिवसांत आणखी राजकीय आणि सामाजिक पाठबळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




