मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध विनोदी कलाकारराज शर्मा यांचे 24 एप्रिल 2026 रोजी निधन झाले. अवघ्या 50 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती एका कॉमेडी क्लबने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली असून, त्यानंतर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
राज शर्मा यांच्या निधनामुळे स्टँड-अप कॉमेडी विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या विनोदी शैलीत वेगळेपणा आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याची खासियत होती. त्यांच्या कामामुळे अनेक नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळाली होती.
दरम्यान, अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास यांनी आपल्या जिवलग मित्राच्या निधनावर भावनिक पोस्ट शेअर केली. त्यांनी सांगितले की, आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ‘लाफ फॅक्टरी’मध्ये पहिली संधी राज यांनीच दिली होती. “त्यांनी मला अमेरिकन मार्केटमध्ये उभं राहण्यासाठी आत्मविश्वास दिला, योग्य सल्ला दिला आणि भरभरून हसवलं,” असे वीर यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
वीर दास यांनी पुढे ‘विअर्डेस्ट पायजामा फेस्टिव्हल ‘ आणि ‘डेस्टिनेशन अननोन’ सारख्या कार्यक्रमांमध्ये राज यांना अग्रक्रम दिल्याची आठवणही शेअर केली. “राज, तू एक उत्तम मित्र आणि विलक्षण कलाकार होतास. तुझ्याशिवाय पुन्हा स्टेजवर उभं राहणं कठीण वाटतं,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. राज शर्मा यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांनी 7 एप्रिल रोजी ICU मधून शेवटची पोस्ट शेअर करत ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या त्या पोस्टने चाहत्यांना भावूक केले असून, आज त्यांच्या आठवणींनी सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.




