बीसीसीआयने तातडीने नियम बदलण्याची केली मागणी
आयपीएल २०२६ मधील पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात एका जुन्या नियमामुळे पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. पंजाबच्या डावातील शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पंचानी विष्णू विनोदला ‘एलबीडब्ल्यू’ बाद दिले. मात्र, विष्णूने रिव्ह्यू घेतला आणि तो नाबाद ठरला. दरम्यानच्या काळात फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली होती, पण पंचांनी आधीच ‘आऊट’ घोषित केल्यामुळे तो चेंडू ‘डेड बॉल’ मानला गेला आणि पंजाबला ती हक्काची धाव नाकारण्यात आली.
या प्रकारानंतर भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. “आयसीसीने हा नियम बदलावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण बीसीसीआयने आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट सब’प्रमाणे यातही बदल करायला हवा,” असे मत अश्विनने मांडले. एका धावेमुळे सामन्याचा निकाल बदलू शकतो किंवा सामना सुपर ओव्हरमध्ये जाऊ शकतो, त्यामुळे चुकीच्या निर्णयामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाचे नुकसान होऊ नये, अशी तिखट प्रतिक्रिया अश्विनने दिली असून त्याचे हे ट्विट सध्या क्रीडाविश्वात चर्चेचा विषय ठरले आहे.




